वसई : वसई-विरार पालिकेने पे अॅण्ड यूज तत्त्वावर एका संस्थेला पेल्हार येथे दिलेले शौचालय बांधण्याचे काम पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर असतानाच त्यावर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेने धानीव-पेलहार प्रभाग क्षेत्रातील वसईफाटा येथे पे अॅण्ड यूज तत्त्वावर बापा सीताराम जनसेवा महिला मंडळाला सुलभ शौचालय बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. सदर सुलभ शौचालयाचे भूमिपूजन प्रभाग एफचे सभापती अब्दुल हक्क पटेल, नगरसेविका अंजली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. या वेळी पालिकेचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्घाटनानंतर शौचालयाच्या कामाला सुरुवात झाली. संस्थेने केलेले बांधकाम जवळजवळ पूर्णत्वास आले असताना अचानक थांबवण्यात आले. त्यानंतर, अचानक शौचालयाचे केलेले बांधकाम तोडून टाकण्याचा आदेश प्रभारी सहायक आयुक्त राजेंद्र पाटील अभियंता कल्पेश पाटील यांना देताच त्यांनी अनधिकृत बांधकामविरोधी पथकाचे अधिकारी, कर्मचारी यांना घेऊन शौचालयाचे बांधकाम जेसीबीच्या मदतीने तोडले.विशेष म्हणजे शौचालयाचे बांधकाम तोडण्यासाठी पालिकेने मोठाफौजफाटा आणला होता. ठेका अभियंता कल्पेश पाटील यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, सदर संस्थेने चुकीचे काम केले म्हणून तोडण्यात आले, अशी माहितीठेका अभियंता कल्पेश पाटील यांनी मनसेच्या तालुकाध्यक्ष जे. पाटील यांनी दिली. त्यावर पाटील यांनी, तुम्हीच बांधकामावर देखरेख करीत होते ना, मग चुकीचे बांधकाम कसे केले गेले आणि जेसीबीच्या मदतीने तोडण्याची आवश्यकता काय व एवढे कर्मचारी कशाला? शौचालय अनधिकृत होते काय? असा प्रश्न विचारला असता अभियंता पाटील यांनी उत्तर देण्याचे टाळले. (प्रतिनिधी)
शौचालय अनधिकृत ठरवून पालिकेकडून कारवाई
By admin | Published: September 08, 2016 2:10 AM