वसई : अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी वसई रेल्वे पोलिसांनी रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. रुळ ओलांडणाऱ्या १ हजार २३७ प्रवाशांकडून वर्षभरात ५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर गेल्या दहा दिवसात २२० प्रवाशांना अटक करण्यात आली रेल्वे रुळ ओलांडताना वर्षभरात शेकडो प्रवाशांना आपला प्राण गमवावा लागल्याची गंभीर दखल घेवून पश्चिम रेल्वेने रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांची धरपकड सुरु केली आहे. वसई रेल्वे पोलिसांनी १ जानेवारी २०१५ ते १० डिसेंबर २०१५ दरम्यान १ हजार २३७ प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ लाख ७० हजार ५२५ रुपयांचा दंडही वसूल केला. डिसेंबर महिन्यात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आल्यावर अवघ्या दहा दिवसांत २२० जणांवर रेल्वेने अटकेची कारवाई केली. त्यानंतरही प्रवासी रुळ ओलांडून जीव धोक्यात घालत असताना दिसत असल्याने रेल्वेने चिंंता व्यक्त केली.विरार, नालासोपारा, वसई रोड आणि नायगांव या रेल्वे स्थानकातील कोणत्या प्लॅटफॉर्मवर कोणती गाडी येईल याचा भरवसा नसतो. अनेकदा नेहमीच्या प्लॅटफॉर्मवर येणारी गाडी दुसऱ्याच प्लॅटफॉर्मवर येते. आयत्यावेळी घोषणा केली जात असल्याने प्रवासी गाडी पकडण्यासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडताना दिसतात. रेल्वेने आपले वेळापत्रक आणि फलाट नीट सांभाळले तर प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालावा लागणार नाही.
वसईत रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: December 17, 2015 12:23 AM