नालासोपारा : नालासोपारा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अनधिकृत दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या पार्किंगवरमुळे येथे येणारे प्रवासी तसेच तसेच डेपोतील कर्मचाऱ्यांना त्रास होत होता. हा त्रास थांबावा यासाठी डेपो मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवत बुधवारी १०० ते २०० वाहनांच्या टायरची हवा काढत कारवाई केली आहे.
वास्तविक, नालासोपारा डेपोत बेकायदा पार्किंग बंद करण्यात आली होती. मात्र तरीही काही खाजगी वाहने येथे पार्क केली जात होती. यामुळे ही कारवाई कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, अनधिकृत पार्किंगवरवर कारवाई करण्यासाठी नालासोपारा आणि वाहतूक पोलिसांना पत्रव्यवहार केला होता. पण कारवाई होत नसल्याचे पाहून हे पाऊल उचलण्यात आले.
नालासोपारा पश्चिमेला असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बस डेपोला खेटूनच नालासोपारा रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्थानकात उतरणारे हजारो प्रवासी येथूनच ये-जा करतात. मात्र खासगी वाहने उभी केली जात असल्याने एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. या डेपोच्या शेजारीच वाहनतळ आहे. मात्र नागरिक तेथे वाहने उभी करण्याऐवजी येथे उभी करतात. तरीही बेकायदा पार्किंगवर सुरु असल्याने येथे एसटी महामंडळातर्फे फलक आणि दोन सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते. त्यांच्यामार्फत गाड्यांना डेपोत जाण्यास मज्जाव करण्यात येत होता. मात्र तरीही बेकायदा वाहने पार्किंग करण्याचे काम सुरूच होते. एसटी
महामंडळातर्फे बेकायदा पार्र्किंग रोखण्यासाठी नेमण्यात आलेले सुरक्षा रक्षक ठराविक वेळेपुरते येथे दिसून येत असल्याने सायंकाळ नंतर ते दिसत नसल्याचे प्रवासी बाळा गादीवर यांनी सांगितले. वाहतूक पोलिसांनीही यावर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. तीही कारवाई थंडावल्याने पुन्हा डेपोच्या परिसरात खासगी वाहनांचे पार्र्किंग करण्यास सुरवात झाली होती. शेवटी महामंडळातर्फे बुधवारपासून कारवाई करण्यास सुरवात झाली.
या डेपोमध्ये दररोज शेकडो दुचाकी तसेच चारचाकी वाहने बिनधास्तपणे पार्किंग केली जातात. तर दुसरीकडे रिक्षाचालक सुध्दा थेट डेपोमध्ये रिक्षा घेऊन येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी कोणत्या ठिकाणाहून चालायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेवटी कारवाई करण्यात आली असून १०० ते २०० पेक्षा जास्त वाहनांची हवा काढण्यात आली आहे. ही कारवाई पुढेदेखील सुरु राहणार आहे.- प्रज्ञा सानप (डेपो मॅनेजर, नालासोपारा)
एसटी महामंडळातर्फे करण्यात आलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करीत आहोत. आम्हा प्रवाशांना या खाजगी गाड्यांमधून रस्ता काढणे जिकरीचे झाले होते. त्यामुळे अशी कारवाई दररोज झाली तर आम्हा रेल्वे प्रवाशांचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे.- आशिष कर्णिक (रेल्वे प्रवाशी)