मनोर : पालघर तालुक्यातील पूर्व भागात ग्रामपंचायत लालोंढे परिसरात येणाऱ्या गवळीपाडा येथील दगडखाणी बंद करण्याच्या ग्रामसभेच्या ठरावाला वर्ष उलटले. त्यानंतर पुन्हा तहसीलदारांकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी कारवाई काहीच केली नाही. त्या ठरावाला केराची टोपली दाखवली आहे. आता महसूल मंत्र्यांनी तरी दखल घ्यावी, अशी मागणी तक्रारदार ग्रामस्थ करीत आहेत. आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ग्रामपंचायत लालोंढे हद्दीत गवळीपाडा जवळील दगड खाणींमध्ये स्फोट केला जातो. त्यामुळे परिसरामध्ये हादरे बसतात. त्यामुळे घरांना भेगा पडल्या आहेत, तर काही घरांच्या पत्र्यांवर दगड पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच बोरवेलचे पाणी गायब झाले आहे. तेथील ग्रामस्थांना त्रास होत असल्याने १३/४/२०१८ रोजी झालेल्या ग्रामसभेत ठराव करण्यात आला. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत लालोंढे यांनी ग्रामसभेचा ठराव विविध कार्यालयांत देऊन दगड खाणी बंद करण्यासाठी सांगितले. त्याला एक वर्ष पूर्ण झाले तरी अद्यापही कारवाई झालेली नाही.
या प्रकरणी पुन्हा तक्र ार केली, तरी सुद्धा काहीच फरक पडलेला नाही. पालघर तहसीलदार शिंदे व जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यांनी ग्रामसभेच्या ठरावाला व ग्रामस्थांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली आहे. अधिक माहितीसाठी तेथील तलाठी एस. चुरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, त्याच्याकडे रॉयल्टी आहे. तो रीतसर दगड खाण चालवितो. मी घराला तडा गेलेले पत्रे फुटले याचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात पाठवला आहे. त्यांना काय कारवाई करायची ते करतील, असे उत्तर त्यांनी दिले.
तहसीलदार सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना लालोंढे गवळी पाडा कुठे आहे हे माहीत नाही. उत्तर देताना त्यांना काही कळेना. त्यांनी त्यांच्यासोबत त्याच सजेतील तलाठी एस. चुरी यांच्याकडे फोन दिला आणि म्हणाले, त्यांच्याशीच बोला. चुरी म्हणाले, साहेबांनी आदेश दिले तर आज बंद करू. पंचनामे करून ते दिलेले आहेत.
महसूल मंत्र्यांकडे दाद
सध्या नागझरी परिसरात शेकडो दगडखाणी सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात सुरुंग लावून स्फोट केला जातो. त्याचा परिणाम भविष्यात परिसरात होण्याची भीती व्यक्त केली जात आहें महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन धोकादायक दगड खाणी बंद कराव्यात, अशी मागणी चंद्रकांत गवळी व अन्य ग्रामस्थांनी केली आहे.