अनिरुद्ध पाटील -बोर्डी : पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. आदिवासींच्या परंपरा, सामुदायिक विवाहांना प्राधान्य तसेच मागील काही वर्षात या समाजात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहाेचल्याने बालविवाहाच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. तर अन्य समाज प्रौढ विवाहालाच प्राधान्य दिल्याचे दिसून येते. दरम्यान, कोरोनाच्या काळातही बालविवाहाला थारा मिळाला नसल्याचे चित्र आहे.पालघर हा आदिवासी जिल्हा देशाच्या आर्थिक राजधानी लगत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील एक-दोन तालुक्याचा अपवाद वगळता आधुनिकतेचा शिरकाव झाला आहे. समाजधुरीण, समाजसेवक आणि भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक, पद्मश्री अनुताई वाघ, कॉम्रेड गोदावरी परुळेकर अशा अनेकांच्या प्रयत्नाने बालके व महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. शिक्षण महर्षींच्या प्रयत्नाने आणि शासनाच्या आदिवासी प्रकल्पाच्या आश्रमशाळा ज्ञानगंगा घरोघरी पोहाेचण्यास मदत झाली आहे. यामुळे बालविवाह खूपच घटले आहेत.
कोरोनाकाळातही जिल्ह्यात बालविवाहाला थारा नाहीजिल्ह्यात कोरोनाच्या काळातही बालविवाहाला थारा मिळाला नसल्याचे चित्र आहे. शिवाय येथील आदिवासी समाजातील विवाहाच्या प्रथेप्रमाणे लग्नासाठी कडक धोरण नाही. मासिकपाळी नंतर मुलीला सज्ञान समजले जाते. स्वत:च्या मर्जीने मुलगा-मुलगी एकत्र राहून संसार करतात. त्यानंतर योग्य वेळ ठरवून विवाह केला जातो.आर्थिक सक्षमतेनंतर लग्नबंधनात अडकण्याची इच्छाआदिवासी तरुण-तरुणी उच्चशिक्षित होऊन नोकरी मिळाल्यावर आर्थिक सक्षमता आल्यानंतर लग्नबंधनात अडकण्याची मानसिकता वाढत आहे. तर विविध संस्थांनाकडून सामुदायिक विवाहाचे आयोजन केले जाते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने नोंदणीकृत विवाहाचे प्रमाण वाढले आहे.
विवाह नोंदणी बंधनकारक रेशनकार्ड, मुलांचे शैक्षणिक प्रवेश आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विवाह नोंदणी बंधनकारक आहे. या सर्वांमुळे पालघर जिल्ह्यात बालविवाह होताना दिसत नाहीत.
जिल्ह्यात काही वेळा पाल्यांच्या विवाहाच्या काही दिवस आधी आई-वडील विवाह करीत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.१,१९९ - सामुदायिक विवाह पार पडले.
पालघर जिल्ह्यात मागील ३५ वर्षांपासून ठाणे जिल्हा श्रमिक झोपडपट्टी सुधार संघातर्फे आदिवासी सेवक कै. अशोक नाना चुरी सामुदायिक विवाह आयोजित करीत. आतापर्यंत १,१९९ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत. त्यांचे अलीकडेच कोरोनामुळे निधन झाले आहे. मात्र २१ मार्च रोजी सामुदायिक विवाह आयोजित केला आहे. -संतोष चुरी, पालघर