वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत विरोधी पक्षाची वाताहत झाल्यामुळे सभागृहात विरोधी पक्षाची ताकदही क्षीण झाली आहे. त्यामुळे महापौर प्रवीणा ठाकूर यांनी सल्लागार समिती स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या माध्यमातून विकासकामे करण्यात येणार आहेत. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे पानिपत झाले आणि सभागृहातील संख्याबळ ३० वरून ८ वर आले. ही स्थिती लक्षात घेऊन महापौर ठाकूर यांनी महानगरपालिका क्षेत्रातील विविध समस्यांचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करण्याकरिता मान्यवरांची सल्लागार समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या सल्लागार समितीत आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी महापौर, उपमहापौर, माजी नगराध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, माजी विरोधी पक्षनेते, साहित्यिक व कला-क्रीडा प्रतिनिधींचा समावेश करण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी स्वत: महापौर प्रवीणा ठाकूर आहेत, तर निमंत्रक म्हणून उपमहापौर उमेश नाईक काम पाहणार आहेत. या समितीच्या सातत्याने बैठका होणार असून या बैठकांत परिसरातील विकासकामांना गती देणे, त्यामध्ये पारदर्शकता निर्माण करणे, प्रशासनाकडे संबंधित विकासकामांचा पाठपुरावा करणे इ. कामे केली जाणार आहेत. अशाच प्रकारच्या समित्या प्रभाग स्तरावरही स्थापन होणार असल्याचे या वेळी महापौर प्रवीणा ठाकूर यांनी सांगितले.
विरोधी पक्षाऐवजी वसईत नेमणार सल्लागार समिती
By admin | Published: July 24, 2015 3:35 AM