पालघर - कोठडीत असताना सफाळे पोलिस ठाण्यातून पळालेल्या आरोपीला २९ वर्षांनंतर मूळगाव आसमा खत्री फलिया (जि. बलसाड) येथून जेरबंद करण्यात आले. ही कारवाई पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. हरेश बाबू पटेल (वय २५, रा. आगरवाडी, मूळगाव बलसाड) असे आरोपीचे नाव आहे.
सफाळे भागातील आगरवाडी येथील जीवदानीपाडा येथे राहणाऱ्या महादेव चौधरी यांच्या वाडीत मोहन दुबळी यांचा १९ एप्रिल १९९५ साली खून झाला होता. याची माहिती सफाळे पोलिसांना मिळाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी हरेश पटेल या आरोपीला सफाळे पोलिसांनी आसमा (खत्री फलिया, तालुका पारडी, जिल्हा बलसाड) येथून ताब्यात घेतले हाेते. दोघेही सफाळे भागात इमारत बांधकाम करीत असताना त्यांच्यात वाद झाला होता. वादाचे पर्यवसान हाणामारीत हाेऊन आरोपीने त्याच्या डोक्यात फावडा घालून जीवे मारले होते. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला पालघर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीत असताना पटेल याने २६ एप्रिल १९९५ रोजी पहाटे पळ काढला होता. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल विभुते यांच्यावर कामगिरी सोपवली होती. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे, राजेश वाघ, हवालदार राकेश पाटील, मधुकर दांडेकर यांची पथके तपासासाठी रवाना केली होती.