वाडा : येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी शनिवारी झालेल्या छाननीत चार उमेदवाराचे अर्ज बाद झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी एक तर सदस्य पदासाठी तीन असे एकूण चार अर्ज बाद झाले आहेत.यामध्ये प्रभाग क्र मांक १६ मधील उषा हरवटे यांनी उमेदवारी अर्जावर सही न केल्याने, प्रभाग क्र मांक १४ मधील भरत गायकवाड, प्रभाग क्र मांक ३ मधील नितीन म्हात्रे यांनी एबी फॉर्म न जोडल्यामुळे तर नगराध्यक्ष पदाकरीता जागृती काळण यांनी एबी फॉर्म न जोडल्यामुळे त्यांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले. नगराध्यक्ष पदाकरीता सहा तर सदस्य पदाकरीता ९९ पैकी ८७ अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत.वाडा नगरपंचायतसाठी नगराध्यक्ष पदा करीता भाजपकडून आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची मुलगी निशा सवरा, शिवसेनेकडून माजी आमदार शंकर आबा गोवारी यांची कन्या गीतांजली कोळेकर, काँग्रेस कडून सायली पाटील, राष्ट्रवादी कडून अमृता मोरे, तर मनसेकडून अस्मिता शितोळे यांनी अर्ज भरले आहेत.सायली पाटील ही शिवसेनेचे भिवंडी विधानसभा संपर्कप्रमुख गिरीश पाटील यांची मुलगी आहे. त्यांनी शिवसेनेकडून तिकिट मिळावे म्हणून प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना शिवसेनेने तिकीट न दिल्याने त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली असून प्रथमत: शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. येथे सर्वच राजकीय पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी खरी लढत ही भाजप व सेना यांच्यातच आहे. दरम्यान, सर्वच पक्षाकडून संपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे.नगर पंचायतअर्ज मागे घेण्याची तारीख ३० नोव्हेंबर असून याच दिवशी निवडणूकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. अद्यापही काही पक्षात बोलणी सुरू असल्याने कोण अर्ज ठेवतो आणि कोण मागे घेतो हे अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच दिसून येईल.
वाड्यात चौघांचे अर्ज बाद, सेनेमध्ये प्रथमच बंडखोरी, १७ प्रभागात ८६ उमेदवारी अर्ज पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 3:31 AM