मीरारोड - पाणी पट्टी दरवाढ व नव्याने पाणी पुरवठा लाभकर मीरा भार्इंदरकांवर लादुन १५ दिवस होत नाही तोच सत्ताधारी भाजपाने नागरीकांवर नव्याने ५ टक्के मलप्रवाह कर बसवला आहे. शिवाय १० टक्के रस्ता कर व मालमत्ता कर भाडेमुल्याच्या दरवाढिचे प्रस्ताव पुढिल सभेत आणण्यास सांगत नागरीकांवर करवाढिची टांगती तलवार नविन वर्षात देखील सत्ताधारयांनी कायम ठेवली आहे.
महापालिकेत बहुमताने भाजपा सत्तेत आल्यावर अवघ्या चार महिन्यातच नागरीकांना कर व दरवाढिची झळ बसु लागली आहे. स्थायी समिती मध्ये भाजपाने बहुमताने १६ डिसेंबर रोजी पाणीपट्टीच्या निवासी दरात २ रु. तर वाणिज्य दरात १० रु. नी वाढ मंजुर केली. या शिवाय नागरीकांवर नव्याने ५ टक्के इतका पाणी पुरवठा लाभकर लादला.
पाणीपट्टी वाढ व पाणी पुरवठा लाभकर लावुन १५ दिवस होत नाही तोच आज शनिवार ३० डिसेंबरच्या स्थायी समिती सभेत भाजपाने बहुमताने पुन्हा ५ टक्के इतका मलप्रवाह वसुल करण्याचा ठराव मंजुर केला. या ठरावास शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोध केला असला तरी भाजपाचे संख्याबळ जास्त असल्याने बहुमताने कर आकारणी मंजुर केली. ज्या इमारती वा बांधकामांना मलप्रवाह जोडणीची सुविधा उपलब्ध आहे त्यांच्या कडुनच ५ टक्के मलप्रवाह कर वसुल केला जाणार आहे.
तर पालिका गेल्या १० वर्षां पासुन भुमिगत गटार योजनेसाठी नागरीकां कडुन ८ टक्के मलप्रवाह सुविधा कर आकारत आहे मग नविन मलप्रवाह कर कशाला ? असा सवाल करत काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी विरोध केला. योजनेचे काम अजुन अपुर्ण असुुन नागरीकांना सुविधा मिळालेली नाही. आणि एक कर आकारत असताना त्याच गोष्टी साठी दुसरा कर आकारताय. नविन कर लावल्या नंतर आधीचा कर रद्द करणार का ? याचा खुलासा जुबेर यांनी मागीतला. पण प्रशासनाने खुलासा केलाच नाही.
नागरीकांवर नव्याने १० टक्के इतका रस्ता कर बसवण्यास देखील काँग्रेस - शिवसेनेने विरोध केला. परंतु भाजपाच्याच सुरेश खंडेलवाल यांनी विषय सविस्तर आणा असे सांगत रस्ता कर आकारणीचा प्रस्ताव पुढच्या सभेत घेण्यास सांगीतले.
मालमत्ता कर भाडेमुल्याच्या दरवाढिच्या प्रस्तावा वर देखील जुबेर यांनी निवासी आणि वाणिज्य मालमत्तांची माहिती व मागणीचा तपशील आदि दिलाच नसल्याने त्यास विरोध केला. त्यावर भाजपाच्याच नगरसेवकांनी मालमत्ता कर भाडेमुल्य दरवाढिचा विषय देखील पुढिल सभेत आणा असा ठराव केला.
१६ डिसेंबरच्या सभेत पाणीपट्टी दरवाढ व नविन पाणी पुरवठा लाभकर नागरीकांवर बसवल्या नंतर आज शनिवार ३० डिसेंबरच्या सभेत सत्ताधारी भाजपाने आधीचा मलप्रवाह सुविधा कर सुरु असताना व योजना अपुर्ण असतानाच नव्याने ५ टक्के मलप्रवाह कर लावला आहे. तर रस्ता कर , मालमत्ता भाडेमुल्य वाढीचे प्रस्ताव मात्र पुढच्या बैठकीत नेत नागरीकांवर करवाढीच्या ओझ्याची टांगती तलवार नविन वर्षात देखील कायम असल्याचे स्पष्ट झालं आहे.
भाजपा कडे स्पष्ट बहुमत असले तरी नागरीकांवर एका पाठोपाठ एक सत्ताधारी भाजपा कडुन कर व दरवाढीचा बोजा लादला जात असताना विरोधी पक्षातील शिवसेना व काँग्रेसचा या कर व दरवाढिला होणारा विरोध फारसा प्रभावी नसल्याचे दिसत आहे. तर भाजपाने देखील टप्या टप्याने नारीकांवर कर व दरवाढ लादण्याचे नियोजन केल्याचे दिसतेय.