हुसेन मेमन जव्हार : जव्हार नगरपरिषदेने आदिवासी बेरोजगार तरुणांसाठी बांधलेल्या गाळ्यांचे वाटप अद्यापर्यंत आदिवासी तरुणांना करण्यात आलेले नाही. त्यामुळे गेली पाच वर्षे ते पडूनच आहेत.जव्हार नगरपरिषदेला आदिवासी तरुणांनी यापूर्वी अनेक निवेदने अर्ज, विनंत्या केल्यात. मात्र प्रशासन याबाबत ठोस निर्णय घेत नसल्याने जव्हार शहरातील सुशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण व शिवसेनेतर्फे आज गुरुवार दिनांक १० आॅगष्टपासून बेमुदत उपोषणास सुरवात केली आहे. हनुमान पॉर्इंट मंगेलवाडा शेजारी या ११ गाळ्यांचे बांधकाम पाच वर्षांपूर्वीच नगर परिषदेने केले आहे. मात्र तिच्या प्रशासनाने या गाळ्यांचे वाटपच केलेले नाही. त्यामुळे आदिवासी सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी आज गुरुवार पासून जव्हार नगरपरिषद कार्यालया समोर बेमुदत उपोषणास सुरवात केली आहे.जव्हार नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये हनुमान पॉर्इंट मांगेल वाडा परिसरात आदिवासी लाभार्थ्यांसाठी बांधलेल्या गाळ्यांचे तात्काळ वाटप करण्यात यावे. जयसागर धरणाच्या कॅचमेंट परिसरातील मालकीच्या जागेची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून तातडीने करून धरणाच्या जागेची हद्द निश्चित करावी. जव्हार शहरात रात्रीच्या वेळी ठीक-ठिकाणी अंधार असल्याने रस्त्याने जाण्यास भीती वाटते. या अंधारामुळे दुकानफोडीचे प्रमाण वाढले त्यामुळे नवीन पोल टाकून एलईडी लाइट्स बसवावे. जव्हार पर्यटनस्थळी जुना राजवाडा येथील डंम्पिंग ग्राऊंड हलविण्या संदर्भात ठोस पावले उचलावी, आदींचा समावेश आहे.या मागण्यांचा निर्णय जव्हार नगरपरिषद प्रशासन ठोस निर्णय घेत नाही. तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे उपोषण क्र त्यांनी सांगितले.
आदिवासींसाठीचे गाळे पाच वर्षांनंतरही पडूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 5:28 AM