वसई : गणेशोत्सव संपन्न होताच वेध लागतात ते नवरात्रीचे. नवरात्रीच्या नऊ रात्रींचा जागर येत्या १३ आॅक्टोबर पासून सुरू होणार आहेत. त्यामुळे आदीमायेच्या स्थापनेची धावपळ सुरू झाली आहे. घटस्थापनेला केवळ आठवडाभराचा अवधी असल्यामुळे मूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. वसई विरार उपप्रदेशात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी होत असतो. गणेशोत्सवानंतर त्वरीत नवरात्रीची तयारी करण्यात येत असते. काही गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सवासाठी उभारण्यात आलेले मंडप तसेच ठेवतात व नवरात्रीसाठी त्याचा वापर करतात. यंदाही तसेच होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यंदाही पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यासाठी जोरदार तयारी चालवली आहे. नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. मूर्तींची उंची, रस्त्यात वाहतुकीला अडथळे निर्माण होतील असे मंडप न बांधणे इ. बाबींवर पोलीसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. विरारची जीवदानी, नायगावची चंडीका, डहाणूची महालक्ष्मी, केळवा माहिमची शितलादेवी, वज्रेश्वरी-गणेशपुरीची वज्रेश्वरी, उमेळाची सातमा देवी, या देवींच्या दर्शनासाठी लाखो भक्त या भागात येत असतात.नवरात्रोत्सव काळात ग्रामीण भागातील ग्रामदेवींचीही पारंपारीक पद्धतीने यथासांग पूजा केली जाते. अनेक गावांमध्ये या निमित्ताने जत्राही भरवण्यात येते. या काळात कोट्यावधी रू. ची उलाढाल होत असते. या जत्रेत आपला माल विकण्याकरीता शेजारच्या गुजरात राज्यातूनही व्यापारी या भागात येत असतात. ज्या डोंगरांवर देवीचे वास्तव्य आहे अशा सर्व डोंगरांवर पोलीस यंत्रणेकडून विशेष सुरक्षेचे उपाय योजण्यात येतात. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जागता पहारा व संशयास्पद वावरणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी याचा समावेश असतो. (प्रतिनिधी)
गणेशोत्सवानंतर नवरात्राची धावपळ
By admin | Published: October 09, 2015 11:24 PM