शशी करपे वसई : बालसुधारगृहात असलेल्या श्रवणकुमार दिलीप राय (१५) या बालकामगाराच्या मृत्यूला तेरा दिवस उलटल्यानंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. श्रवणकुमारच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय त्याच्या पालकांनी व्यक्त करून मृत्यूचे नेमके कारण दिले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तर बालकामगाराच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर असून याप्रकरणी मुंबई हायकोर्टात हेबियस कॉर्पसची याचिका दाखल केली जाणार असल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले.१ जून २०१६ रोजी वालीव चिंचोटी येथील धातूच्या बांगड्यांवर नक्षीकाम करणाºया कारखान्यात बचपन बचाव आंदोलन आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने कारवाई करून १६ बालकामगारांची सुटका केली होती. त्यांना भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते. यातील श्रवणकुमारचा १६ आॅगस्ट २०१७ रोजी संशयास्पद मृत्यू झाला आहे.बालकामगारांची मुक्तता करण्यात आल्यानतर वालीव पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली होती. त्यावेळी त्यांना कोणताही आजार अथवा बाधा नव्हती. त्यानंतर त्यांना उल्हासनगर येथील चाईल्ड वेल्फेअर कमिटीसमोर हजर करण्यात आले होते. कमिटीने मुलांची भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी केली होती. याप्रकरणात पोलिसांनी रोहित चौधरी, पंकज चौधरी, पवन चौधरी, विक्रम चौधरी या मालकांविरोधात गु्न्हा दाखल केला होता.श्रवण हा पवन चौधरी यांच्याकडे कामाला होता. त्याची बालसुधारगृहातून मुक्तता करून पालकाच्या ताब्यात देण्यासाठी चौधरी तीन महिन्यांपासून प्रयत्न करीत आहेत. त्यांनी श्रवणच्या सुटकेसाठी तीस हजार रुपयांचे पोस्टल सेव्हिंग सर्टिफि केटही तयार केले होते. त्यानंतरही श्रवणचा ताबा मिळत नव्हता असा चौधरी यांचा दावा आहे. १२ आॅगस्टला पोटात दुखत असल्याने त्याला इंदिरा गांधी हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले होते. उपचारानंतर त्याला सुधारगृहात आणले होते. रात्री त्याची प्रकृती जास्तच खालावल्याने त्याला प्रथम ठाणे सिव्हील हॉस्पीटल आणि नंतर मुंबईतील केईएममध्ये नेण्यात आले होते. यावेळी श्रवणच्या पालकांना बोलावण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे श्रवणच्या रक्तासाठी दहा हजार रुपये आणि सोनोग्राफीसाठी एक हजार रुपये पवन चौधरी यांच्याकडून घेण्यात आले होते. मात्र, १६ आॅगस्टला उपचार सुरु असतानाच श्रवणचा मृत्यू झाला. बाल सुधारगृहाच्या निष्काळजीपणामुळे श्रवणचा बळी गेला आहे. त्याच्या पालकांनी तेरा दिवस उलटले तरी श्रवणचा मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. बाल सुधारगृह आणि चाईल्ड वेल्फेअर याप्रकरणी दोषी असून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी श्रवणचे वडिल दिलीप राय यांनी केली आहे.
श्रवणचा मृतदेह १३ दिवस पडूनच, निष्कळजीपणाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 1:46 AM