पंकज राऊतबोईसर : बोईसर ग्रामीण (टीमा) रुग्णालयाच्या आवारात बुधवारी दुपारी गावठी कट्ट्यातून गोळी झाडून हत्या झालेली पीडित मुलगी नेहा महतो व हत्या करून नंतर आत्महत्या करणारा आरोपी कृष्णा यादव या दोघांचे मागील वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. मात्र, अलीकडेच ब्रेकअप झाल्यामुळे आरोपीने हे पाऊल उचलले असावे असा अंदाज पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. गोळीबाराचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान, तिच्या आई-वडिलांनी पाहिलेले लग्नाचे स्वप्न धुळीला मिळाले आहे.
नेहाच्या आई-वडिलांनी काबाडकष्ट करून बारावीपर्यंत तिला शिकविले होते. मात्र, दरम्यानच्या काळात तिचे आरोपी कृष्णा यादवबरोबर वर्षभरापासून प्रेमप्रकरण सुरू होते. त्यामुळे मृत मुलीच्या कुटुंबीयांकडून लग्न करण्याच्या आग्रहानंतरही कृष्णा लग्न करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची माहिती मुलीच्या आईने माध्यमांशी बोलताना दिली. फसवणूक करून माझ्या मुलीची हत्या केल्याचा आरोपही तिने केला आहे.
या तरुणीची हत्या कृष्णा याने का केली, त्याने गावठी कट्टा कुठून आणला, याचा कसून शोध बोईसर पोलीस घेत आहेत. तारापूर एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत काम करणारा कृष्णा कोलवडे गावातील एका चाळीत मित्रासोबत राहत होता. दरम्यान, पोलिसांनी कृष्णाच्या जवळच्या नातेवाइकांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने तसेच मृतदेह घेण्यासाठीही कुणीही नातेवाईक पुढे न आल्याने मृतदेह शवागारात ठेवला आहे.
हृदय हेलावणारी घटनागोळीबाराची हृदय हेलावून टाकणारी संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कृष्णा याने नेहाच्या मागून येऊन अतिशय जवळून तिच्या डोक्यात गोळी झाडल्याबरोबरच ती जागीच कोसळून रक्तबंबाळ होऊन मृत्यू पावली. यानंतर कृष्णा यानेही त्याच कट्ट्यातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. मात्र, कट्ट्याच्या चेंबरमध्ये राउंड अडकल्याने ते शक्य न झाल्याने तो शांतपणे चालत बाहेर पडत असल्याचे दिसत आहे.