हुसेन मेमन जव्हार : जव्हार नगर परिषदेचे कामकाज मागील काही वर्षापासून काही ना काही कारणास्तव बंद पडलेले असून, नुकतीच पालघर लोकसभा पोटनिवडणूकीची आचारसंहिता संपत नाही तोच कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे पुन्हा अनेक विकास कामांची मंजुरी आचारसंहितेमुळे लटकलेली असून अनेक कामांच्या मंजुरी व विकास लांबणीवर पडणार आहे.मागील काही वर्षापासून नगर परिषदेत नगरसेवकांची गटबाजी व बंडखोरी झाली, त्यात ५ नगरसेवकांचे पद रद्द झाल्यामुळे मागील वर्षी नगर परिषदेची पोटनिवडणूक झाली, त्यानंतर मध्यंतरीच्या काळात नगर परिषदेची सार्वत्रीक निवडणूक यामुळे सर्वसाधारण सभा होणे अशक्य होते, यात सार्वत्रिक निवडणूकीनंतर नविन बॉडीच्या फक्त दोन ते तीनच सर्वसाधारण सभा घेण्यात आल्या, त्यात शकडो कामांचे विषय व ठराव झाले. परंतु पुन्हा पालघर लोकसभेचे खासदार चिंतामण वणगा यांच्या मृत्यू नंतर नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीची आचारसंहिता संपण्या आगोदरच पुन्हा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका जाहिर झाल्यामुळे पुन्हा जून महिना आचार संहितेमध्ये जाणार आहे.दरम्यान नगर परिषदेचे दिवंगत नगरसेवक अमोल औसरकर यांचा दिर्घ आजाराने मृत्यू झाला आहे, त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली असून, या जागेकरीता जुलै ते सप्टेंबरच्या काळात पोटनिवडणूक लागणाची शक्यता आहे, त्यामुळे नगर परिषदेला माहे एप्रिल पासून तर सप्टेंबर पर्यत कुठलाच निर्णय घेता येणार नसल्याचे चित्र समोर येत आहे. जव्हारच्या विकासाला जणू गेल्या काही वर्षापासून साडे साती लागलेली आहे.त्यात प्रशासनाच्या ढिम्म कामगीरीमुळे मागील सत्तेच्या काळात म्हणजेच मागील दोन वर्षापूर्वी मिळालेल्या मंजुरीची कामे आजही अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका नागरीकांना बसत आहे, यात प्रामुख्याने शहरातील मुख्य रस्ते व गल्ली बोळांचे डांबरीकरण करणे, गटारे बांधणे आदी कामांचा समावेश आहे. ज्याकामांचे आदेश पारीत झालेले आहेत, अशा कामांना कालावधी दिलेला असतो, मात्र त्याचे पालन कुठेही होताना दिसत नाही.
पुन्हा आचारसंहिता लागू, विकासकामे रखडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:51 PM