कासा : परतीच्या पावसाने तसेच वादळाने डहाणू तालुक्यातील भात शेतीचे नुकसान झाले असताना दुसरीकडे शेतीवर आता खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेती उद्ध्वस्त होण्याची भीती असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
तालुक्यातील कासा, सायवन, वाणगाव, धुंदलवाडी भागातील काही गावांमध्ये खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. गरव्या भाताचे दाणे भरण्याच्या काळात कीटक भाताच्या कणसाचा गाभा खातात. हे दाणे न भरताच भाताचे लोम्ब मरू लागतात. त्यामुळे भाताचे उत्पन्न कमी होणार आहे.
हळव्या भाताचे पीक तयार झाले असताना परतीच्या तसेच वादळी पावसाने त्याचे नुकसान केले. तर गरव्या भाताचे पीक तयार झाले असताना त्याच्यावर खोडकिड्याची लागण झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार असून उत्पादन घटणार असल्याचे शेतकरी सुनील घरत यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन नाही
सुरुवातीपासून पाऊस योग्य प्रमाणात पडल्याने भात पीक चांगले आले. मात्र परतीच्या तसेच वादळी पावसाने पीक शेतात आडवी पाडून टाकली. त्यात काही पिके कुजून गेली तर दाणे रु जल्याने नुकसान झाले. आता खोडकीडा रोगाने भात शेतीचे नुकसान होत असताना कृषी विभागाकडून कोणतेही मार्गदर्शन शेतकºयांना होताना दिसत नाही. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव असाच वाढत गेल्यास भातशेती उद्ध्वस्त होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.