लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - सध्या मशिदीच्या भोंग्यांवरून राजकारण तापून धार्मिक वातावरण ढवळून निघाले असताना मीरारोडच्या अल शम्स मस्जिद मध्ये मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार आवाजाची पातळी मर्यादेत ठेवण्यासाठी अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा बसवण्यात आली आहे . इतकेच नव्हे तर जमातींना एकाच वेळेत किंवा दोन टप्प्यात नमाज पठणची व्यवस्था करून रस्त्यावर नमाज पठण बंद केले आहे . अल शम्स जामा मस्जिदच्या ह्या आदर्श पायंड्याची चर्चा देश पातळीवर होत असून सर्च धर्मियांच्या धार्मिक स्थळांना दिशा देणारे आहे .
१९७९ सालात मीरारोडच्या नया नगर भागात आकाराला आलेली अल शम्स जामा मस्जिद सध्या आकर्षक रोषणाई , आतून वातानुकूलित आणि सुंदर अश्या अंतर्गत सजावट मुळे जेवढी चर्चेत आली नाही त्यापेक्षा जास्त भोंग्यांना ध्वनिमापक व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा नुसार आवाजाची मर्यादा पाळण्याच्या यंत्रणे मुळे चर्चेत आली आहे .
कोरोनाच्या काळात लॉक डाऊन असल्याने धार्मिक स्थळे देखील बंद होती . त्या काळात ह्या मस्जिदीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले व जवळपास ते पूर्ण सुद्धा झाले . मस्जिदीला तीन रंगात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे . हि रोषणाई यंत्रणा अमेरिकेतून आणण्यात आली आहे . अंतर्गत सजावट देखील डोळ्याचे पारणे फेडणारी आहे . गालिचे , अंतर्गत रोषणाई नमाज पढण्यासाठी केलेली व्यवस्था चर्चेचा विषय आहे .
परंतु मस्जिदी वरील भोंग्याच्या आवाजा वरून जे राजकारण तापवण्यात आले आहे त्या आवाजाच्या मर्यादेवर मस्जिदीच्या ट्रस्टींनी आधीच उपाय शोधला आहे . न्यायालयाच्या आदेशा नुसार सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये व ध्वनी प्रदूषण बाबत दिलेल्या आदेशांचे पालन काटेकोरपणे करण्यासाठी मस्जिदीचे ट्रस्टी मुझफ्फर हुसेन यांनी जर्मन बनावटीची ध्वनी यंत्रणा मस्जिदी मध्ये बसवली आहे .
ध्वनी प्रदूषण रोखण्यासह न्यायालयाच्या आदेशांचे पालन व्हावे व परिसरातील लोकांना त्रास होऊ नये यासाठी भोंग्या द्वारे दिल्या जाणाऱ्या अजानच्या आवाजाची मर्यादा राखण्यासाठी जर्मनी वरून आणलेली यंत्रणा बसवली आहे . न्यायालय व शासन निर्देशक नुसार कोणत्या वेळेत आवाजाची मर्यादा किती राखावी हे यंत्रणा ठरवणार आहे . त्यासाठी तज्ज्ञ नेमले आहेत . त्यामुळे भोंग्या वरून दिली जाणारी अजानची हाक मंजूर आजावाजाच्या मर्यादेत राहणार आहे . जेणे करून न्यायालय व शासन आदेशांचे पालन होणार आहे असे मुझफ्फर म्हणाले .
मस्जिदी मध्ये जागा अपुरी पडते म्हणून रस्ता - गटार व पदपथावर नमाज पढण्यासाठी भाविक बसत असतात . जेणे करून रस्ता - पदपथ मोकळे ठेवण्यासाठी सुद्धा मस्जिदीच्या व्यवस्थापनाने पुढाकार घेतला आहे . त्यासाठी २ ते ३ जमातींना एकत्र नमाज पढण्यासाठी बसवून बाहेरच्या रस्ता - पदपथावर नमाज पढणे आदी बंद केले आहे . आवाजाची मर्यादा राखण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे व पर्यावरण संरक्षण कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आपल्या धार्मिक प्रार्थना - कार्य करताना अन्य कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतल्यास निवडणुका आल्या की धर्माचे राजकारण करून तेढ निर्माण करणाऱ्यांना फुकटची प्रसिद्धी मिळणे बंद होईल असा टोला मुझफ्फर यांनी लगावला.