लोकमत न्यूज नेटवर्कविरार : जागतिक कोरोना महामारीमुळे वसई-विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक लांबणीवर गेली असली तरी या निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. वसई-विरार शहर महानगरपालिकेत बविआची एकहाती सत्ता असताना येथे अन्य पक्षांची फारशी डाळ शिजली नव्हती, मात्र अलीकडे राज्यामध्ये सत्तेची समीकरणे बदलल्यानंतर आता वसई-विरार महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीकडे वसई-विरारकरांचे लक्ष लागले आहे.वसई-विरार महानगरपालिकेत एकहाती सत्ता असलेल्या बविआला नामोहरम करणे कोणत्याही पक्षाला सध्या तरी शक्य नसले तरी शिवसेनेने बविआचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे. तर राज्यातील विरोधी पक्ष भाजपचा केवळ एकमेव नगरसेवक होता. यामुळे राजकीय ताकद कमी असलेल्या भाजपला वसई-विरार शहर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करणे हे दिवास्वप्नासारखेच आहे. मात्र तरीही भाजपला राज्यात कोणत्याही निवडणुकीत विजय मिळवू द्यायचा नाही, अशा हेतूने प्रेरित होऊन महाविकास आघाडी सध्या राज्यभरातील निवडणुका एकत्रितपणे लढण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तविली आहे.वसईतील बलाढ्य पक्ष बविआसोबत युती करण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला असल्याचे समजते. या प्रस्तावावर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी अद्याप कोणताही दुजोरा दिला नसला तरी अशा पद्धतीची युती होईल की नाही हे केवळ आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रतिक्रियेनंतरच समजणार आहे.
आघाडीचे भवितव्य आ. हितेंद्र ठाकूर यांच्या हातातराज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांनी आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या बहुजन विकास आघाडीने वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणुकीतदेखील महाविकास आघाडीसोबत मोट बांधण्याचा आग्रह होऊ लागला असल्याचे समजते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यात सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढावी आणि भाजपला विजयापासून दूर ठेवावे, अशी महाआघाडीची व्यूहरचना आहे. मात्र वसईत महाविकास आघाडीचे भवितव्य स्वत: आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हातात आहे.