- हितेंन नाईक।पालघर : आॅनलाइनच्या अतिरिक्त कामांचा बोजा शिक्षकांवर लादल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येणार असल्याने पालघर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी या कामांवर आजपासून बहिष्कार टाकला आहे.शासनाने मागील दोन-तीन वर्षांपासून वेगवेगळी शालेय कामे आॅनलाइन पद्धतीने करण्यावर भर दिला आहे. साहजिकच ही सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातून शाळांना पर्यायाने शिक्षकांना भरावी लागते. तसेच या माहितीचे कोणतेही नियोजन नसल्याने देण्यात आलेली माहिती पुन्हापुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने व तातडीने भरावी असे आदेश व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देण्यात येतात. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल असल्याने ग्रामीण भागात इंटरनेट च्या कोणत्याही सुविधा शासनाने पुरविलेल्या नाहीत. त्यामुळे शासन पातळी वरून आलेल्या माहितीची पूर्तता या खाजगी व्यक्ती अथवा सायबर कॅफे मधूनच कराव्या लागतात. त्याचा आर्थिक भुर्दंड मात्र शिक्षक वर्गाला सहन करावा लागतो. मात्र शिक्षकांचे खरे कार्य हे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणे हे असून आरटीआय अॅक्ट २००९ च्या शिक्षण कायद्यानुसारही शिक्षकांनी फक्त अध्यापनाचे काम करणे अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे. मात्र शासन व त्यांचा शिक्षण विभाग मात्र हवे तेव्हा आणि हवे त्या पद्धतीने वेगवेगळी शालेय कामे, अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकावर टाकीत आहेत.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे यांच्या कार्यालयात सेनेचे सहसंपर्क प्रमुख केतन पाटील,ज्योती ठाकरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संगीता भागवत, विलास पिंपळे तसेच जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वयक समिती अंतर्गत शिक्षक संघ, आदिवासी शिक्षक संघ, प्रा. शिक्षक सेना, प्रा. शिक्षक परिषद, स्वाभिमान शिक्षक संघ, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, प्राथमिक शिक्षक समिती, पदवीधर शिक्षक संघ, उर्दू प्राथमिक संघटना, कास्ट्रईब शिक्षक संघ यांच्यात झालेल्या चर्चे नंतर हा बहिष्कार घालण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
पालघर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा आॅनलाइनच्या कामांवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 3:47 AM