नंडोरे : पालघर जिल्हा मुख्यालयाच्या कामाची प्रगती चांगली असून संपूर्ण जिल्ह्यासह आम्ही पाहिलेले उद्दिष्ट लवकरच पूर्णत्वास येत असल्याचा आनंद पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी पालघर कोळगाव येथे सुरु असलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या कामाचा आढावा घेताना व्यक्त केला.प्रत्यक्षात या सर्व इमारतीचे पायाभरणी पूर्ण झाली असून इमारतींचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा मुख्यालय लवकरच येथील जनतेसाठी खुले होणार असून याचे काम प्रगतीपथावर व योग्य दिशेने सुरु असल्याची सुखद माहिती आपण मुख्यमंत्र्यांना देणार आहोत असेही ते यावेळी म्हणाले. त्यांनी या कामाच्या ठिकाणी भेट देऊन काम कसे सुरु आहे याचा आढावा घेतला व या कामाचे स्वरूप उपस्थित अभियंत्यांकडून समजून घेतला. सिडकोचे जिल्हा मुख्यालय प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस. देशपांडे यांनी पालकमंत्र्यांना प्रकल्पाविषयीची सविस्तर माहिती देत या चारही इमारती मार्चपर्यंत व ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न सुरु असल्याची त्यांना सागितले. यावेळी या कामाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांसह जिल्हा परिषद सभापती अशोक वडे, उपजिल्हाधिकारी नवनाथ जरे, जिल्हा पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, तहसीलदार महेश सागर, नायब तहसीलदार सी. पवार, जिल्हा माहिती अधिकारी तसेच या प्रकल्पाचे उप अभियंते दिलीप शर्मा, संदेश देवरे, एम.खंडाळकर, घाडेकर उपस्थित होते.शैक्षणिक उपक्रम- या प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांची शाळा येथे सुरु असल्याचे लक्षात आल्यावर पालकमंत्र्यानीं समाधान व्यक्त केले. या लहान मुलांना येथील स्थानिक शिक्षण संस्थात प्रवेश मिळवून देण्याचे त्यांनी यादरम्यान उपजिल्हाधिकारी नवनाथ जरे यांना सांगितले. तसेच, त्यांच्या पालकांचेही आभार मानले.
मुख्यालयाबाबत ‘आॅल इज वेल’, पालकमंत्र्यांनी व्यक्त केले समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:20 AM