वसई : वसई - विरार शहरातील सुमारे ८१ खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविल्याने त्यांना महापालिकेच्यावतीने बक्षीसपर धनादेशाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी वसई विरारचे उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी, सभापती सखाराम महाडिक, महिला बालकल्याण सभापती माया चौधरी, नगरसेविका सुरेखा कुरकूरे, वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळाचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी, पालघर क्रीडा विभागाचे जावले, इतर क्र ीडा शिक्षक उपस्थित होते.
वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंना क्र ीडा संजीवनी योजने अंतर्गत बक्षीस देण्याची योजना महानगरपालिकेत मंजूर आहे. त्या अनुषंगाने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंना १९ लक्ष ९५ हजार इतक्या रक्कमेचे धनादेश शुक्रवारी महापालिका मुख्यालयात वितरित करण्यात आले. यामध्ये मैदानी स्पर्धा, जलतरण, सायकलिंग, किक बॉक्सिंग, रायफल शुटींग, तायक्वांदो, हॉकी, स्केटींग साहसी खेळ, कॅरम, कबड्डी अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांचा समावेश आहे.
आपली महापालिका रस्ते, गटार, आरोग्य इतकीच कामे करीत नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्र ीडा क्षेत्रात देखील भरीव काम करीत आहे. महापालिका आपणांस नेहमी सहकार्य करीत राहील. येत्या काही दिवसांत उर्वरित खेळाडूंना देखील वित्त सहाय्य महापालिकेमार्फत खेळाडूंना दिले जाणार असून त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यांत आहे, असेही सभापती सुदेश चौधरी यांनी सांगितले.
जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घेण्याचे आवाहनवसई - विरार महानगरपालिकेने २०१३ मध्ये क्रीडा संजीवनी योजनेची अंमलबजावणी सुरू केली. दरवर्षी अनेक खेळाडू या योजनेचा लाभ घेतात. ही आनंदाची गोष्ट असून जास्त खेळाडूंनी स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्राविण्य संपादित करावे, असे आवाहन उपमहापौर रॉड्रिक्स यांनी केले.
एखाद्या खेळाडूने राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळविल्यास त्याची माहिती तत्काळ महानगरपालिकेच्या क्र ीडा विभागात द्यावी, जेणेकरुन या योजनेचा लाभ त्यांना देता येईल व खेळाडू वंचित राहणार नाही, असे महिला आणि बालकल्याण सभापती माया चौधरी म्हणाल्या.