हितेन नाईकपालघर : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमुळे यंदा अनेक जिल्ह्यांत रेकॉर्डब्रेक पीककर्ज वाटप झाले आहे. पालघर जिल्ह्यातही खरीप हंगामासाठी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक १२ हजार ५७०, राष्ट्रीयीकृत बँक ६ हजार ७३० तर ग्रामीण बँकेला ७००चा लक्षांक देण्यात आला होता, यापैकी ६६ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये २०-२१च्या खरीप हंगामासाठी जिसम बँकेला १० हजार ७०० शेतकऱ्यांना, तर रब्बी हंगामासाठी १ हजार ८७० शेतकऱ्यांना अशा एकूण १२ हजार ५७० शेतकऱ्यांना कर्जवाटपाचा लक्षांक देण्यात आला होता. यापैकी ७ हजार ६२२ तर रब्बी हंगामासाठी १ हजार ५५४ शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले. राष्ट्रीयीकृत बँकेला खरीप हंगामासाठी ५ हजार ७२५, तर रब्बी हंगामासाठी १ हजार ५ अशा एकूण २ हजार ३६३ शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी खरीप हंगामासाठी २ हजार ३६३ शेतकऱ्यांना कर्जवाटप केले गेले आहे. तर ग्रामीण बँकेला खरीप हंगामासाठी ६००, तर रब्बी हंगामासाठी १०० अशा एकूण ७०० शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ६० जणांना कर्जवाटप झाले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय बँक आणि ग्रामीण बँकेकडून रब्बी हंगामासाठी कर्जवाटप झालेले नाही. महात्मा फुले योजनेतील सर्व शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर वेळेत अपलोड करून त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून दिला आहे. याबाबत कुणाचीही तक्रार आलेली नाही, अशी माहिती पालघरचे जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी दै. ‘लोकमत’ला दिली.
महात्मा फुले योजनेतील सर्व शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर वेळेत अपलोड करून त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून दिला आहे. याबाबत कुणाचीही तक्रार आलेली नाही. - दिगंबर हौसारे, जिल्हा उपनिबंधक
ज्या शासकीय योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आमच्या भागापर्यंत पोचतच नाहीत. त्यामुळे आम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही.- दीपेश पावडे, शेतकरी, आंबरे
आमच्या काटाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे १ कोटी ५५ लाखाचे कर्ज माफ झाल्यामुळे संस्थेला ४१ लाख ६९ हजाराचा नफा झाला आहे. - महेंद्र अधिकारी, चेअरमन, काटाळे सहकारी संस्था.