वसई/विरार - वसईत एका कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात नेताना वसई-विरार महापालिकेच्या रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारच्या वेळी घडली आहे. वसई पश्चिमेच्या पापडीच्या स्टेटस हॉटेल समोर हा अपघात घडला. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे समजते
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील एका कोरोनाबाधित रुग्णास उपचारासाठी वसईच्या जी.जी कॉलेज येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यासाठी वसई महापालिकेची रुग्णवाहिका निघाली होती. शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पापडी येथील स्टेटस हॉटेलपर्यंत ती पोहचताच या रुग्णवाहिकेचा एक्सेल निखळून पडला व धाडकन ही रुग्णवाहिका रस्त्यावरील डाव्या बाजूच्या खांबाला जावून आदळली. या रुग्णवाहिकेत एकच रुग्ण होता तर सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रुग्णवाहिकेचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे.
दरम्यान लागलीच रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान राखीत दुसरी रुग्णवाहिका बोलावून त्या रुग्णाला कोविड सेंटर मध्ये पाठवले. मात्र, आता नेमकी यात चूक कुणाची अथवा रुग्णवाहिका व्यवस्थित होती की नाही हे तपासून बघण्याची जबाबदारी पालिका वाहन विभागाची असताना अर्थातच या अपघात घटनेनंतर महापालिकेच्या रुग्णवाहिकेच्या दुरुस्ती व डागडुजीचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.