पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष पदाची निवडणूक उद्या (मंगळवारी) होत असून अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या अमिता घोडा यांनी माघार घेतल्याची माहिती पुढे येते आहे. यामुळे शिवसेनेच्या भारती कामडी किंवा वैदेही वाढाण यांचे पारडे जड झाले आहे. तर उपाध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या निलेश सांबरे यांची निवड एकमताने झाली आहे.पालघर जिल्हा परिषदेत एकूण ५७ सदस्य असून शिवसेना १८, राष्ट्रवादी १४, भाजप १२, माकप ५, बविआ ४, अपक्ष ३ तर काँग्रेस १ असे संख्याबळ असून १८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना समोर आला आहे. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा २९ हा आकडा पार करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी (१४ जागेसह), काँग्रेस (१) आणि जिजाऊ संघटना (अपक्ष १) अशी साथ मिळाली आहे.
राज्यात सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी महाआघाडी सत्तेत असून राज्याचा कारभार सुरळीत चालवत असून आता पालघर जिल्हा परिषदेतही हीच महाआघाडी सत्ता स्थापन करेल, यात कुठलीही शंका उरलेली नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या अडीच वर्षाचे आरक्षण महिलांसाठी (अनुसूचित जमाती) राखीव असून सत्ता स्थापनेत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना पहिल्या अडीच वर्षांच्या अध्यक्षपदाचा दावा करणार आहे. राष्ट्रवादीनेही ते मान्य केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून कळते.शिवसेनेकडून सेनेचे माजी आ. अमित घोडा यांची पत्नी अमिता घोडा, वैदेही वाढाण आणि भारती कामडी यांची नावे चर्चेत होती. परंतु, आता अमिता घोडा यांचे नाव मागे पडल्याची चर्चा असल्याने आता वैदेही वाढाण आणि भारती कामडी यांच्यापैकी एकाची निवड करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या १४ सदस्यांपैकी विक्रमगडमधील ३, जव्हारमधील १, वाड्यातील ४ जागा निवडून आणण्यात यशस्वी झालेले आणि स्वत:ही अपक्ष म्हणून निवडून आलेले जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे यांची उपाध्यक्षपदासाठी एकमताने निवड झाल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. एकूण चार सभापती पदे असून दोन्ही पक्षात त्याचे समसमान वाटप केले जाणार आहे. राज्यात महाविकास आघाडीत बविआची साथ असली तरी जिल्ह्यात सेना आणि बविआमधून विस्तवही जात नाही. त्यामुळे इथे कुठल्याही परिस्थितीत बविआला सत्तेत घेऊ नये, अशी मागणी होत आहे.सेना-राष्ट्रवादीचे बहुमतच्नुकत्याच झालेल्या पंचायत समितीचे सभापती-उपसभापती पद निवडताना शिवसेनेने बविआपेक्षा भाजपला जवळ करून जव्हार आणि वसई येथे सत्ता स्थापन केली. मात्र जिल्हा परिषदेत सेना आणि राष्ट्रवादी या दोघांच्या सदस्यांची बेरीज बहुमताचा आकडा पार करीत आहे.