मंगेश कराळे
नालासोपारा - ओमान येथे घरकामासाठी गेलेल्या वसईच्या ३० वर्षीय महिलेचा व्हिसा आणि पासपोर्ट घेऊन डांबून ठेवले होते. याबाबत तक्रारी अर्ज प्राप्त झाल्यावर आयुक्तालयाच्या विशेष शाखेच्या पोलिसांनी योग्य पाठपुरावा करत त्या महिलेची पाच दिवसांत सुखरूप सुटका करून भारतात आणण्यात यश मिळाले आहे.
वसई कोळीवाड्याचा साईदत्त नगरमध्ये राहणाऱ्या कमलावती पारस वर्मा (५०) यांची मुलगी अंजु वर्मा (३०) ही २५ ऑगस्टमध्ये मस्कत, ओमान या देशामध्ये नोकरीकरिता गेली होती. परंतु सध्या तिला तेथे नोकरी करताना त्रास होत असुन तीला तेथे नोकरी करायची नाही. तसेच तिला परत भारतात यायाचे आहे, परंतु तीचा पासपोर्ट व व्हिसा ओमान देशातील एजंट प्रसन्ना याच्याकडे जमा असुन तो तिला व्हिसा व पासपोर्ट देण्यास नकार देत असुन ती तीन दिवसांपासुन मस्कत, ओमान एअरपोर्ट येथे थांबली असल्याबाबत आईने वसई पोलीस ठाण्यात ४ जानेवारीला तक्रार अर्जाद्वारे कळविले. सदरचा अर्ज वसई पोलीस ठाणे यांचेकडुन विशेष शाखा, पारपत्र विभाग यांना प्राप्त होताच पारपत्र विभागाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली ओमान, मस्कत येथे अडकलेली भारतीय महिला अंजु वर्मा यांच्यासोबत संपर्क केला. तेव्हा एजंट प्रसन्ना याने अंजुचा व्हिसा २ वर्षाकरिता वाढविला असुन त्यासाठी त्याचे पैसे खर्च झाल्याने तो तिला पासपोर्ट व व्हिसा देत नसल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर पोलिसांनी मस्कत देशातील भारतीय दूतावास यांना ई मेल करून अंजुला मदत करण्याची विनंती करत सर्व हकीकत सांगितली. त्यांनी तिला सर्वोतोपरी मदत करण्याची व तिला आश्रय देण्याची विनंती मान्य करून तेथील भारतीय दूतावास यांच्या कार्यालयात पोहचण्यास सांगितले. त्यानुसार भारतीय दूतावासांनी तिच्या व्हिसा स्पॉन्सरशी संपर्क करुन सर्व कायदेशिर बाबी पुर्ण करुन तिकडील कायदयाप्रमाणे लेबर कोर्टात व्हिसा रदद केल्याने अंजु ९ जानेवारीला सुखरुप भारतात पोहचली. कमलावती वर्मा यांची मुलगी सुखरुप भारतात परत आल्याने त्यांनी पोलीसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहेे.
सदरची कामगिरी मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, विशेष शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक कुमारगौरव धादवड, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवनी सोलनकर, महिला पोलीस हवालदार मंजुषा गुप्ता व सिमा दाते यांनी पार पाडली आहे.