बोर्डी : मतदान सुरळीत पार पाडण्याकरिता तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या चहापाणी, भोजन याची सोय नव्हती. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत हे लोकमतने सोमवारच्या अंकात प्रसिद्ध करताच चिखले गावातील लिलू सुरेश गावड यांनी या कर्मचाºयांसाठी खास भोजनालय सुरू केले. व त्यांची क्षुधा शमविली.
दरम्यान चिखले गावात हे कर्मचारी खानावळीची विचारणा करीत असताना, कुठेच सोय झाली नाही. त्यांची ही आबाळ लक्षात घेऊन या मतदान केंद्रालगत राहणाºया लिलू सुरेश गावड या महिलेने माफक दर घेऊन जेवण देण्याचे कबूल केले. हा ग्रामीण भाग असल्याने स्वयंपाककरिता तत्काळ वस्तू मिळणे कठीण असतांनाही त्यांनी हे शिवधनुष्य पेलले. सुरुवातीला सायंकाळच्या चहाची व्यवस्था करतांना, दहा ते बारा व्यक्तींकरिता उत्तम प्रकारचे घरगुती जेवण बनविले.
त्यानंतर आज मतदानाला सकाळी सात वाजता प्रारंभ होण्यापूर्वी चोवीस कर्मचाऱ्यांना चहानाश्त्याची आणि तेवढ्याच व्यक्तींना दुपारचे जेवण आणि सायंकाळी पुन्हा चहाची सुविधा पुरवली. त्यामुळे ही महिला आपल्याकरिता खरोखरच अन्नपूर्णा ठरल्याची भावना कर्मचाऱ्यांची होती.
कर्मचारी झाले तृप्त आणि खुषनिवडणूक कर्मचारी ड्युटी बजावत असल्यानेच आपण हे काम मनापासून स्वीकारल्याचे लिलू गावड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. त्यामुळे या मतदानाच्या काळात अनेकजणींनी अन्नपूर्णा होण्याचे कार्य केलेले असेल, त्यांचा नक्कीच सन्मान होणे अपेक्षित आहे.असाच पुढाकार प्रत्येक मतदान केंद्रानजीकच्या नागरिकांनी घेतला तर कर्मचाऱ्यांनाही नवा हुरूप चढेल. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.