- पंकज राऊत, बोईसर
दुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळा तसेच वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना आरोग्यदायी वातावरणात बनविलेला दर्जेदार नाश्ता, दुपार-रात्रीचे सकस भोजन मिळावे या उद्देशाने आदिवासी विकास विभाग, रतन टाटा ट्रस्ट आणि अक्षयपात्र फाऊंडेशनच्या माध्यमातून साकारलेल्या अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाक गृहाचे अनौपचारीक उद्घाटन व अग्नीपूजन आज आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा व उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते करण्यात आले. त्याचा लाभ सतरा आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर (पूर्व) येथील एकलव्य रेसीडेन्शियल स्कुलमध्ये अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृह उभारण्यात आले असून आदिवासी विभागाचे प्रधान सचिव राजगोपाळ देवरा, अप्पर आयुक्त मिलिंद गवादे, प्रकल्प अधिकारी नेरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, पालघर जि. प. अध्यक्ष सुरेखा थेतले, पोलीस अधिक्षक शारदा राऊत, पालघरचे तहसिलदार चंद्रसेन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व यंत्रणा स्वयंचलीत असलेल्या या स्वयंपाकगृहाची पाहणी करून उपस्थित कर्मचाऱ्यांचे मंत्र्यांनी अभिनंदन केले या कार्यक्रमास पालकमंत्री विष्णु सवरा सुमारे तासभर उशीरा आल्याने काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.अन्नपूर्णा या मध्यवर्ती स्वयंपाक गृहातून बोईसर येथील एकलव्य रेसिडेन्शीयल स्कूलसह परिसरातील ४० कि.मी. अंतरावरील सतरा शासकीय आश्रमशाळेतील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना सकस आहार पुरविण्यात येणार असून या उपक्रमाला रतन टाटा ट्रस्टने चार कोटीची मदत दिली असून प्रकल्पाचे संपूर्ण व्यवस्थापनाची व अन्नपुवठ्याची जबाबदारी अक्षयपात्र फाऊंडेशन ही संस्था पुढील तीन वर्ष पाहणार आहे. त्यानंतर ही योजना महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील मुंढेगाव येथे अन्नपुर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृह ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली असल्याने मुंंढेगाव येथे देशातील पहिले मध्यवर्ती स्वयंपाकगृह उभारण्यात आले.