वसई : मागील आठवड्यात दोन महिलांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना वसई रोड भागात आणखी एका मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.वसई रोड पश्चिम येथे साईनगर परिसरातील एका इमारतीत ही १६ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासमवेत राहयची. गेल्याच आठवड्यात विरारमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.दरम्यान झालेले मृत्यू डेंग्यूने झाले नसून उलट गेल्यावर्षीच्या तुलनेत डेंग्यूवर नियंत्रण आणण्यास यावर्षी महापालिका प्रशासनाला बऱ्यापैकी यश आल्याचा दावा महापालिका नियुक्त वेक्टर डिसीज कंट्रोलचे व्यवस्थापक सचिन शेट्टी यांनी केला.डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी महापालिकेने खास एक पथक तयार केले आहे. ज्या ठिकाणी आम्हाला डेंग्यूचा उपद्रव झाल्याचे निदर्शनास आले की आम्ही सतत तीन दिवस जाऊन त्या परिसरातील जवळपास शे- दीडशे घरांची पाहणी करून त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाय योजना करतो. यावर्षी आम्हाला कुठेही डेंग्यूचा उपद्रव दिसला नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
वसईत डेंग्यूमुळे आणखी एका महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 5:59 AM