पालघर-बोईसर : कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा प्रशासनास यश आले असताना पुन्हा काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकड्यात थोडी वाढ होऊ लागल्याचे दिसून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पथकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी पालघर, बोईसर, डहाणू रेल्वेस्थानकांची पाहणी केली. जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी दळणवळणाचे मुख्य साधन रेल्वे असून या रेल्वेस्थानकामध्ये तसेच रेल्वेमध्ये प्रवासी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करत आहेत का? नागरिक मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आहेत का? सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत आहेत का? याबाबत पालघर, बोईसर, डहाणू रेल्वेस्थानकांची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केली.
पश्चिम रेल्वे येथून सुटणाऱ्या विशेष रेल्वे दिल्ली, राजस्थान, गुजरात आाणि गोवा राज्यांकडे जातात. यामुळे बाहेरगावाहून आलेल्या आणि डहाणू, बोईसर, पालघर रेल्वेस्टेशनवर पोहोचणाऱ्या रेल्वे प्रवाशांची कोविडची चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ यांनी दिले आहेत. इतर राज्यांतून येणाऱ्या ट्रेनमधून प्रवाशांच्या तपासणीच्या व्यवस्थेचीही पाहणी या वेळी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित रेल्वेस्टेशनवर नियुक्त केलेल्या केंद्रांची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या. बाहेरून आलेल्या प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात यावी, अशा सूचना या वेळी त्यांनी दिल्या. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, सहायक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, धनाजी तोरस्कर, तहसीलदार सुनील शिंदे, राहुल सारंग आदी मान्यवर उपस्थित होते.