'तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखा; वसई-विरार महापालिका आयुक्तांची तात्काळ नियुक्ती करा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 22:22 IST2022-01-10T22:21:19+5:302022-01-10T22:22:06+5:30
रुग्णालयांची व्यवस्था, लसीकरण आणि बुस्टर डोसची व्यवस्था, कचऱ्याची व्यवस्था, तसेच मूलभूत नागरी सोयी-सुविधांसंदर्भातील गंभीर प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची सध्या वसई विरार शहराला गरज आहे.

'तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखा; वसई-विरार महापालिका आयुक्तांची तात्काळ नियुक्ती करा'
वसई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून आणि महापालिकेच्या आरोग्य विभागासह इतरही विभागांची स्थिती लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेत तातडीने प्रशासक तथा आयुक्तांची नियुक्ती करावी, अशी मागणी वसई-विरार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे.
आपल्या निवेदनात आल्मेडा म्हणाले, शहराची लोकसंख्या २५ लाखांपेक्षा अधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वसई-विरार शहरात पसरत आहे. मात्र अजूनही काही कोविड रुग्णालये कार्यान्वित झालेली नाहीत. ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही, त्यांना कोरोनाच्या तिसरा लाटेचा मोठा फटका बसू शकतो. त्यात शहरातील मूलभूत नागरी सोयी-सुविधांकडे लक्ष देणे आणि कोवीड-१९ लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरात कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या २००० वर गेली असून ही बाब गंभीर आहे.
दरम्यान, रुग्णालयांची व्यवस्था, लसीकरण आणि बुस्टर डोसची व्यवस्था, कचऱ्याची व्यवस्था, तसेच मूलभूत नागरी सोयी-सुविधांसंदर्भातील गंभीर प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची सध्या वसई विरार शहराला गरज आहे. त्यामुळे महापालिकेत तातडीने प्रशासक अथवा आयुक्तांची नेमणूक करावी, असे काँग्रेसने म्हटले आहे.