लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील प्रस्तावित काशीगाव पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जितेंद्र वनकोटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . मात्र ह्या प्रस्तावित ठाण्याची हद्द व पोलीस ठाण्याच्या जागेची अजून निश्चिती झालेली नाही .
मीरा भाईंदर परिमंडळ १ मधील काशीमीरा पोलीस ठाणे हे मीरा भाईंदर मधील वजनदार पोलीस ठाणे मानले जाते . ह्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वात जास्त ऑर्केस्ट्रा बार , लॉजिंग आहेत . या शिवाय औद्योगिक वसाहती , नवीन इमारत बांधकाम , झोपडपट्ट्या , निवासी संकुल , महामार्ग व घोडबंदर मार्ग , मोकळ्या जमिनी येतात . त्यामुळे या पोलीस ठाण्यासाठी मोठी चुरस असते .
वाढत्या शहरीकरणा मुळे ठाणे ग्रामीण पोलीस असताना काशीमीरा पोलीस ठाण्याची विभागणी करून काशीगाव पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता . त्यासाठीची हद्द निश्चिती केली गेली होती . नंतर मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आल्या नंतर प्रस्तावित काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बदल करण्यात आला . परंतु पोलीस ठाण्यांची हद्द अजून निश्चित होऊन मंजुरी मिळालेली नाही .
प्रस्तावित काशीगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी जितेंद्र वनकोटी यांची नियुक्ती केली गेली आहे. ६ ऑक्टोबर रोजी अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी वनकोटी यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. आदेशात देखील प्रस्तावित काशीगाव पोलीस ठाणे असे स्पष्ट नमूद आहे .
काशीगाव पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची व्यवस्था , मनुष्यबळाचे व्यवस्थापन आदी कार्यवाही करून काशीगाव पोलीस ठाणे स्थापन करणे व कार्यान्वित करण्याची कार्यवाही करून तसा अहवाल सादर करण्याचे ह्या नियुक्ती आदेशात नमूद केले आहे .
पोलीस आयुक्तालय झाल्यावर तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी जितेंद्र वनकोटी यांच्या कडे गुन्हे शाखेची जबाबदारी दिली होती . त्या नंतर दाते यांनी नया नगर सारखे ताणतणावाचे मानले जाणाऱ्या पोलीस ठाण्याची धुरा सोपवली होती . त्यामुळे काशीगाव पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी वनकोटी यांच्यावर दिल्याचे मानले जाते .
परंतु पोलीस ठाण्याची हद्दच जिकडे निश्चित नाही. पोलीस ठाण्याच्या जागे पासून अनेक मूलभूत कामांची पूर्तता अजून बाकी असल्याने एकूणच पोलीस ठाणे सुरु करण्यासाठी काही कालावधी लागणार हे निश्चित . वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नेमल्याने आता वनकोटी यांना बसण्याची जागा आधी शोधावी लागणार आहे .
शिवाय पोलीस ठाणे कार्यान्वित करायचे तर सुरवातीला काही कर्मचारी , संगणक , कार्यालय आदी व्यवस्था सुद्धा आवश्यक ठरणार आहे . दरम्यान पोलीस विभागातील जबाबदार अधिकारी यांनी सुद्धा काशीगाव पोलीस ठाण्याची हद्द अजून निश्चित झाली नसल्या बाबत दुजोरा दिला आहे .