शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : धूप प्रतिबंधक बंधारा नसल्याने अर्नाळा गावात समुद्र तब्बल १५० फूट घुसला आहे. त्यामुळे मोठ्या उधाणात किनाऱ्यावरील घरे वाहून जात आहेत. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास आलेल्या उधणाच्या लाटांनी गावातील चार घरे वाहून गेली तर तीन घरांची पडझड झाली. अनेक झाडेही वाहून गेली. गेल्या तीन वर्षांपासून उधणाच्या लाटा घरे गिळंकृत करीत असल्याने गावकरी भयभीत झाले आहेत.अर्नाळा किल्ला हे साडे चार हजार लोकवस्ती आणि ४३५ घरांचे गाव आहे. गावाला चारही बाजूने समुद्राने वेढले आहे. त्याच्या समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने मोठया लाटांनी किनारा उद्धवस्त केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यात उधाणाच्या लाटांच्या तडाख्याने किनाऱ्यालगतची घरे वाहून जात आहेत. सुमती म्हात्रे या अपंग महिलेला मिळालेले घरकुल वाहून गेले. त्याचबरोबर अनुसया मेहेर, भरत मेहेर, लक्ष्मण मेहेर यांची घरे वाहून गेली.किनारा वाचवण्यासाठी ५०० मीटरच्या धूपप्रतिबंधक किनाऱ्याची गरज आहे. माजी सरपंच आणि पंचायत समितीच्या सभापती चेतना मेहेर यांनी याप्रकरणी पाठपुरावा केला होता. तेव्हा गेल्या वर्षी १०० मीटरचा बंधारा मंजूर होऊन १ कोटी ३० लाख रुपये मेरी टाईम बोर्डाकडे जमा झाले आहेत. निविदा प्रक्रि या होऊन ठेकेदार नेमला गेला आहे. मात्र सीआरझेड चा अडथळा आल्याने मेरी टाईम बोर्डाने काम सुरू केलेले नाही.मेहेर यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून सीआरझेड चा अडथळा दूर केला आहे. त्यानंतरही बंधाऱ्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या पावसाळ्यात समुद्र गावात घुसून मोठी हानी होणार असल्याची भीती मेहेर यांनी व्यक्त केली आहे. याबाबत आमदार तसेच खासदार आणि पालकमंत्र्यांनीही तातडीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता या गावातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
अर्नाळा किल्ला गावाला तडाखा
By admin | Published: June 25, 2017 3:51 AM