बोर्डी- तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटाच्या परिसरात फॉरेस्ट कम्पार्टमेंट क्र मांक १४ येथे बिबट्याची कथित शिकार केल्याचा गुन्हा ५ जणांविरुद्ध नोंदविण्यात आला असून त्यांना १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती बोर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी डी. जे. सोनवणे यांनी दिली.वेवजी गावच्या पश्चिम घाट परिसरात बोडी वन कर्मचाºयांना १० जानेवारी रोजी अनोळखी वन्यजीव मृतावस्थेत आढळला होता. तो प्राणी कुजलेलल्या अवस्थेत असल्याने पशुवैद्य अधिकाºयांच्या शिफारसीनुसार घटनास्थळाहून अवशेष गोळाकरून मुंबईच्या कलिना येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. दरम्यान ५० दिवसांच्या कालावधीनंतर ८ मार्च रोजी संशयीत आरोपींपर्यंत पोहचण्यात वन विभागाला यश आले. त्यांच्याकडे कातड्याचा तुकडा, कवटीचा भाग, शेपूट आणि नखं आदी अवयव आढळून आले. तो प्राणी बिबट्याचे असल्याची कबुलीही आरोपींनी दिली. हे आरोपी वेवजी गावचे रहिवासी असून बाबू नवशा सांबर त्यांचा म्होरक्या आहे.बिबट्याची शिकार केल्याचे सिद्ध झाल्यास तीन वर्ष शिक्षा किंवा पंचवीस हजार रूपयांचा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.दरम्यान पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात वन्य जीवांची शिकार होत असून, ती रोखण्यात वन विभागाला अपयश येत असल्याची टीका पर्यावरण प्रेमींनी केली आहे. या घटनेमुळे या विभागाचे दुर्लक्ष होत असून वन्य जीवांच्या सुरक्षेचा प्रश्न अधोरेखीत होत आहे. जादूटोणा अथवा वन्य प्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीकरिता ही शिकार झाली आहे का? हे पाहणे आवश्यक आहे. या तपासानंतर या शिकारी मागील मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वनखात्याच्या अधिकाºयांनी वर्तविली आहे.आपण या बिबट्याला मारले नसून तो आपल्याला मृतावस्थेत आढळल्यानंतर त्याचे कातडे व काही अवयव आपण काढून घेतले असा दावा या पाचही जणांनी केला असून त्याच्याही सत्यतेची चौकशी तपास अधिकारी करीत आहेत.‘मृत अवस्थेत असलेल्या बिबट्याचे अवयव जवळ बाळगल्याचे आरोपींचे म्हणणे असून त्यांच्यावर वन्य जीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. उप वनरक्षक एन. लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.- डी. जे. सोनवणे, बोर्डी वन परिक्षेत्र अधिकारी
वेवजीत बिबट्याचे अवयव बाळगणा-यांंना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 6:23 AM