नालासोपारा (मंगेश कराळे) - फिर्यादीचे बनावट कागदपत्रे तयार करुन विविध बँकेतून कर्ज घेवून वाहने खरेदी करुन फसवणुक करणाऱ्या दोन आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून ९ दुचाकी हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी शनिवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
२१ डिसेंबर ते ११ फेब्रुवारी २०२३ दरम्यान बाबासाहेब लिंबराज ओव्हाळ (३९) यांचे नावाचे आरोपीने बनावट पॅनकार्ड, आधारकार्ड बनवुन त्यांच्यानावे मुथुट फिनकार्प, एस. आय. क्रेवा कॅपीटल, आयडीएफसी फस्ट बॅक, कोटक प्राईम फायनान्स, एलएनटी फायनान्स आणि मास फायनान्स या विविध फायनान्स कंपन्यामधुन ५ लाख २१ हजार ५८३ रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केली होती. विरार पोलिसांनी विविध कलमानव्ये ११ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला होता. या फसवणुकीच्या गुन्हयांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवून आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना व मार्गदर्शन केले होते. दाखल गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट तीनने सुरू केला. प्राथमिक तपासादरम्यान आरोपीने स्वत:ची ओळख लपविण्यासाठी खोटे नाव व पत्ते वापरल्याने त्यांचा शोध घेणे क्लिष्ट झाले होते.
गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सतत पाठपुरावा करुन गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपी संजय बाळा परब (४४) आणि मोहम्मद मुस्ताक युसुफ बोहरा (५०) या दोघांना ताब्यात घेतले. अधिक तपास केल्यावर आरोपीनी त्यांचे इतर साथीदारासोबत आपसात संगणमत करुन हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. अटक आरोपीकडे यांचेकडे अधिक तपास करुन त्यांनी वेगवेगळया इसमांच्या नावे बनावट कागदपत्रांचा वापर करुन विविध फायनान्स कंपन्यामधुन कर्ज घेवुन एकुण ६ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या विविध कंपनीच्या ९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या गुन्हयाचा पुढील तपास विरारचे सहायक पोलिस निरीक्षक प्रविण भोसले हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, शिवाजी खाडे, पोलीस हवालदार अशोक पाटील, मुकेश तटकरे, शंकर शिंदे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, गणेश यादव, संतोष चव्हाण यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.