स्रेहा पावसकर
ठाणे : हिवाळा सुरू झाला की मुंबईतील खाडीकिनारे अनेकविध पक्ष्यांनी सजतात. महाराष्टÑ शासनाने फ्लेमिंगो सॅन्च्युअरी (अभयारण्य) म्हणून घोषित केलेल्या ठाणे खाडीकिनारी सध्या तर फ्लेमिंगोसह असंख्य रंगीबेरंगी परदेशी पाहुण्यांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. पक्षीप्रेमींना याचा आनंद लुटता यावा यासाठी ऐरोली पम्पिंग स्टेशन येथून वनविभागाच्या दोन फेरीबोट सुरू आहेत, तसेच भांडुप पंपिंग स्टेशनहूनही एक खाजगी फेरीबोट सुरू करण्यात आली आहे.
नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच मुंबईतील बहुतांश खाडीकिनारी फ्लेमिंगोचे दर्शन घडते. फ्लेमिंगो सॅन्च्युअरी असलेल्या ठाणे खाडीकिनारी तर त्यांची संख्या अधिक असते. २० टक्के फ्लेमिंगो हे स्थानिक तर सुमारे ८० टक्के फ्लेमिंगो हे कच्छवरून येथे येतात. सध्याही येथे मोठ्या संख्येने फ्लेमिंगो आहेत. याचबरोबर अनेक परदेशी पक्षीही याकाळात स्थलांतरीत होऊन येथे आलेले आहेत. ठाणे खाडीकिनारा छोटे रोहित व मोठे रोहित यांच्यासह छोटा पाणकावळा, छोटा बगळा, मध्यम बगळा, गाय बगळा, ढोकरी, रंगीत करकोचा, मोर शराटी,चमचा, अडई, थापट्या बदक, भुवई बदक, चक्र ांग बदक, घार, समुद्री घार, दलदली भोवत्या, सोन चिखल्या, राखी चिखल्या, केंटीश चिखल्या, छोट्या चिखल्या, मोठ्या चिखल्या, माळ टिटवी, काळ्या शेपटीचा पाण टीलवा, यूरेशिअन कोरल, अनेक जातीचे तुतारी पक्षी, उचाट्या, शेकाट्या अशा अनेक परदेशी पक्ष्यांनी गजबजून गेला आहे.लवकरच आणखी दोन बोटी होणार सुरूवाढती थंडी आणि सुटीचा मोसम असल्याने या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी, त्यांच्या छायाचित्रणासाठी सकाळच्या वेळेस पक्षीप्रेमी, निरीक्षक ठाणे खाडीत गर्दी करू लागले आहेत. या पक्षीप्रेमींकरिता भांडूप पम्पिंग स्टेशन येथून एक बोट सुरू झाली असून लवकरच आणखी दोन बोटी सुरू करण्यात येणार आहेत. स्थानिक मच्छिमार कोळी बांधवांनी, पक्ष्यांच्या नावांचा व ओळखण्याचा अभ्यास करून, नवख्या पर्यटकांना त्याबाबत मार्गदर्शन करणे सुरू केले आहे, अशी माहिती पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक डॉ. सुधीर गायकवाड यांनी दिली.