- सुरेश काटे
तलासरी : पावसाळा संपून थंडीची चाहूल लागताच तलासरीजवळील कुर्झे धरण परिसरात परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू होते. मात्र यंदा अवकाळी पाऊस आणि थंडीचे वातावरण लांबल्याने या परदेशी पाहुण्यांचे आगमन होते की नाही याबाबत साशंकता होती. आता कुर्झे धरण परिसरात पक्ष्यांचे आगमन होऊ लागले आहे. धरणात रंगीबेरंगी, विविध जातीचे आकर्षक पक्षी पाहायला मिळतात. यामुळे येथे निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी पक्षीप्रेमींचीही गर्दी वाढत आहे.
तलासरीत कुर्झे धरण, मोकळ्या जागा तसेच पाणथळ परिसरात हिवाळी हंगामात विविध स्थलांतरीत पक्ष्यांची गर्दी वाढते. त्यामध्ये जलचर पक्ष्यांची संख्या अधिक असते. मात्र लांबलेला पाऊस, हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला असला तरी थंडी अजून पडलेली नाही. त्यामुळे पाहुण्या पक्ष्यांचे ज्या प्रमाणात आगमन होणे अपेक्षित आहे, ते अद्याप झालेले नाही, असे पक्षीप्रेमी सांगत आहेत.
नोव्हेंबर महिन्यात पाणथळ जागी, धरण परिसरातील किनाºयावरील गवत, धरणातील वनस्पतींवर विविध प्रकारचे पक्षी मोठ्या प्रमाणात नजरेत पडत असतात. यामध्ये लहान करकोचे, लहान, मध्यम व मोठे बगळे, वंचक, सूरय, तुतारी, देशी तुतारी, वटवट्या, सोंकपाल, कापसी, राखी, जांभळे बगळे, पाणडुबी, काळ्या डोक्याचा शाराटी, टिटवी व पाणकोंबड्या आदी छोट्या-मोठ्या आकाराचे पक्षी मुक्त विहार करताना नजरेस पडतात. याशिवाय भारतातील विविध भागांतील पक्षीही येथे स्थलांतर करून आल्याचे दिसून येत आहे. अडई-लेसर व्हसलिंग डक, धनवर (हळदीकुंकू बदक), स्पॉट बिल्ट डक, काणूक- कॉटन पिग्मी गुज इत्यादी विविधरंगी रानबदके या हंगामात आढळून येत असतात.
गेल्या वर्षी या हंगामात याच धरणात परदेशी स्थलांतरीत रानबदकांनीही हजेरी लावली होती. यामध्ये लालसरी (कॉमन पोचार्ड), लालमाथ्यामुळे उठून दिसणारे हे मध्यम आकाराचे बदक उत्तर व मध्य युरोपातील, तलवार बदक (नॉर्दन पिनटेल), टोकदार शेपटीमुळे उठून दिसणारे हे मध्यम आकाराचे बदक उत्तर अमेरिका, आशिया व युरोप, चक्रंग (कॉमन टील) चेहºयावरील हिरवट लासर पट्ट्यामुळे उठून दिसणारे हे लहान आकाराचे बदक युरोप व रशियात, गडवाल मध्यम आकाराचे हे बदक उत्तर अमेरिका, आशिया व युरोप, भुवई बदक (गार्गन) उठावदार भुवईमुळे यास ओळखणे सोपे जाते. आशिया व युरोपातील या पक्ष्यांचा येथे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर वावर होताना दिसतो.
शिकारींकडे वन विभागाचे दुर्लक्ष
युरेशियात दलदली व तळ्यांच्या ठिकाणी आढळणारे हे पक्षी जलीय वनस्पती, पानकीडे, शिंपले, छोटे मासे खाऊन उदरभरण करतात. डुबी मारून पाण्यावर हिंडत ते खाद्य शोधतात. पालघर जिल्ह्यात २०१६ च्या जानेवारीमध्ये हा पक्षी प्रथमच दिसल्याचे सचिन मेन यांनी नमूद करत पुढे जानेवारी २०१८ मध्ये हा पक्षी जोडीने दिसल्याचे सांगितले. निसर्गाच्या सानिध्यात, परिसरातील हवामान आणि वातावरण तसेच विपुल प्रमाणात मिळणारे भक्ष्य त्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षी कुर्झे धरण परिसरात वास्तव्य करीत असतात, असे ते म्हणाले. दरम्यान, धरण परिसरात येणाºया या परदेशी पाहुण्यांची स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते, मात्र या शिकारीकडे वन विभागाचे दुर्लक्ष आहे.