नालासोपारा (मंगेश कराळे) - विरारचा आयर्नमॅन हार्दिक पाटील नेहमी नव नवे विक्रम करत आहे. त्याने ३४ दिवसात सातासमुद्रा पार रेकॉर्ड ब्रेक चार इव्हेंट पूर्ण करून देशाच नाव उंचावले असून त्याने भारताचा झेंडा अटकेपार फडकवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या अमेरिका, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि बर्लिन या देशात हार्दिकने दोन फुल आयर्नमॅन, एक हाफ आयर्नमॅन आणि एक फुल मॅरेथॉन स्पर्धा त्याने यशस्वीरित्या पूर्ण करून घवघवीत यश मिळवले आहे.
त्याने ५ नोव्हेंबरला अमिरेकेच्या न्यूयॉर्कमध्ये फुल मॅरेथॉन, १९ नोव्हेंबरला मेक्सिको देशात कॉझुर्नल फुल आयर्नमॅन, ३ डिसेंबरला ऑस्ट्रेलिया देशात बोस्टन फुल आयर्नमॅन आणि ९ डिसेंबरला बेहेरीन देशातील बेहेरीन हाफ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. २०२३ या संपूर्ण वर्षभरात हार्दिकने पाच फुल मॅरेथॉन, सहा फुल आयर्नमॅन आणि दोन हाफ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून एक विक्रमी रेकॉर्ड तयार करून भारत देशाचे नाव लौकिक केल आहे. ११ तास ३६ मिनिटांमध्ये फुल आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केलेली असून ही आतापर्यंत सर्वात जलद पार केलेली फुल आयर्नमॅन स्पर्धा असल्याचे हार्दिक पाटीलने लोकमतला सांगितले. हार्दिकच्या या कामगिरीचा पालघर जिल्ह्यासह विरार-वसईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटला आहे. त्याच्या या यशामुळे पालघर, ठाणे, जिल्ह्यासह देशभरातून त्याच्यावर एक कौतुकाचा वर्षाव होत आहे. तो एक व्यावसायिक असूनही तो वेळोवेळी जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेतो आणि विजेता बनत आपल्या देशाचे नाव मोठ्या उंचीवर नेतो.
तसेच, हार्दिक हा एकमेव भारतीय आहे ज्याने जगभरातील सहा ठिकाणी जागतिक मॅरेथॉन प्रमुख मालिकेत स्पर्धा केली आणि एकूण पाच विक्रम केले. हार्दिकने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये चार वेळा तसेच वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये चार वेळा आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तीन वेळा नोंद केली आहे. येणाऱ्या काळामध्ये पालघर, ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी चांगलं व्यासपीठ म्हणून स्पोर्ट क्लब देखील उघडणार असल्याचा त्याचा मानस आहे.