मंगेश कराळे
नालासोपारा :- विरारचा आयर्नमॅन हार्दिक पाटील नेहमी नव नवे विक्रम करत आहे. त्याने परदेशात मागील १५ दिवसांमध्ये झालेल्या तीन स्पर्धांमध्ये तीन विजेतेपद पटकावले आहे. तीन मोठे इव्हेंट पूर्ण करणारा हार्दिक पाटील हा एकमेव भारतीय ठरला आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्पेन येथील फुल आयर्नमॅन स्पर्धेत त्याने घवघवीत यश मिळवले आहे. तर बर्लिन आणि सिक्काको येथील फुल मॅरेथॉन स्पर्धा त्याने यशस्वी रित्या पूर्ण केली आहे.
स्पेन येथील फुल आयर्नमॅन स्पर्धेत १८० किलोमीटर सायकलिंग, ३.८ किलोमीटर स्विमिंग आणि ४२ किलोमीटर धावणे हे त्याने १४ तास ७ मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली आहे. हार्दिकची ही २३ वी फुल आयर्नमॅन स्पर्धा असून त्याने भारताचा झेंडा अटकेपार फडकवला आहे. बर्लिन येथील १५ वी फुल मॅरेथॉन स्पर्धा त्याने ४ तास ७ मिनिटांत तर सिक्काकोमधील १६ वी फुल मॅरेथॉन स्पर्धा ५ तास ८ मिनिटात पूर्ण करून देशाचे नाव हार्दिकने लौकिक केला आहे.
या स्पर्धेसाठी जगभरातील १०० पेक्षा जास्त देशातील स्पर्धकांनी यावेळी सहभाग नोंदवला होता. हवामानच्या बदलानुसार बर्लिन आणि स्पेनमध्ये २८ ते ३० डिग्री टेंपरेचरमध्ये अतिशय खडतर ही स्पर्धा हार्दिकने पूर्ण केली आहे. हार्दिकच्या या कामगिरीचा पालघर जिल्ह्यासह विरार-वसईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटला आहे. एक व्यावसायिक असूनही तो वेळोवेळी जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेतो आणि विजेता बनत आपल्या देशाचे नाव मोठ्या उंचीवर नेतो.
तसेच, हार्दिक हा एकमेव भारतीय आहे ज्याने जगभरातील सहा ठिकाणी जागतिक मॅरेथॉन प्रमुख मालिकेत स्पर्धा केली आणि एकूण पाच विक्रम केले. हार्दिकने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये चार वेळा तसेच वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये चार वेळा आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तीन वेळा नोंद केली आहे. या वर्षात एक फुल आयर्नमॅन स्पर्धा आणि दोन हाफ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करण्याचा हार्दिकचा ध्यास आहे. त्यासाठी त्याने सराव देखील सुरू केला आहे. येणाऱ्या काळामध्ये पालघर, ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी चांगलं व्यासपीठ म्हणून स्पोर्ट क्लब देखील उघडणार असल्याचे देखील हार्दिकने लोकमतला सांगितले.