लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: एका मुलीसोबत मैत्री होती, पण आईला आवडत नसल्याने तिचे आई-वडील पुढील शिक्षणासाठी तिला गावाला पाठवणार होते, म्हणून घरातून निघून गेल्याची माहिती ‘त्या’ युवतीने पोलिसांना दिली. दरम्यान, आचोळे येथील आदर्शनगर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा कोणताही ठावठिकाणा किंवा संपर्क नसताना आचोळे पोलिसांनी सलग ४८ तास तपास करून शोध लावून तिची सुखरूप सुटका केली आहे. त्या मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिल्याची माहिती आचोळे पोलिसांनी दिली आहे.
आचोळे डोंगरी येथील आदर्शनगर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी आचोळे पोलिस ठाण्यात तक्रार देऊन ४ जुलैला अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तिचे वडील मुलगी मिळत नसल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वारंवार चकरा मारत होते. त्यामुळे आचोळ्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तो गुन्हा महिला पोलिस उपनिरीक्षक रेखा पाटील यांच्याकडे तपासासाठी दिला. त्यांनी मुलगी राहत असलेल्या घरापासून परत गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पेण येथे जाऊन स्वतः साक्षीदारांचा शोध घेऊन तपास केला. मिळालेल्या मोबाइल क्रमांकाचे सीडीआर व टॉवर लोकेशन काढून तांत्रिक विश्लेषण करून मुरबाड व टोकावडे येथील गावात शोध सुरू केला. टोकावडेच्या मालगावातील खेड्यात जाऊन शोध घेतला.
ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक रेखा पाटील, अंमलदार शिवराम शिंदे यांनी अपहरण झालेल्या मुलीचा कोणताही ठावठिकाणा अथवा संपर्क नसताना शोध घेऊन यशस्वीरीत्या कामगिरी पार पाडली.
१५० कंपन्यांत पीडित मुलीचा शाेध
कुडवली एमआयडीसी परिसरातील १५० कंपन्यांत पीडित मुलीचा शोध घेतला; पण ती सापडली नाही. त्याच परिसरात स्वस्तात भाड्याने घरे मिळत असल्याने सुमारे ७० रूम चेक केल्यावर ती मुलगी मिळून आली. एका मुलीसोबत मैत्री होती, पण आईला आवडत नसल्याने तिचे आई-वडील पुढील शिक्षणासाठी तिला गावाला पाठवणार होते, म्हणून घरातून निघून गेल्याचे पोलिसांनी विचारपूस केल्यावर तिने सांगितले.