- हितेन नाईक/अनिरुद्ध पाटीलपालघर/बोर्डी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालयांतर्गत ९वी ते १२वीपर्यंतच्या आश्रमशाळा सुरू झाल्या आहेत. कोविडशी संबंधित नियमांचे पालन करून वर्ग सुरू झाले असले, तरी वसतिगृहाचे दरवाजे अद्याप बंदच असल्याची माहिती या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालयाच्या कक्षेत डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई तालुक्यात आश्रमशाळा व वसतिगृहे आहेत. त्यानुसार, २७ शासकीय माध्यमिक आणि २१ अनुदानित अशा एकूण ४८ आश्रमशाळा आहेत. शासनाच्या नियमानुसार ९ ते १२ इयत्तांचे वर्ग सुरू करण्याच्या आदेशानुसार शाळांना प्रारंभ झाला आहे.देशासह राज्यभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर राज्यातील शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये सर्वच बंद करण्यात आली होती. गेले जवळपास आठ महिने बंद असलेली शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये आता केंद्र आणि राज्य शासनाने कोविडबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरू केली जात आहेत. सध्या ९वी ते १२ वीचे वर्ग सुरू केले आहेत. त्यामध्ये वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन इ.बाबत शिक्षक वर्गाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.या विभागाने प्रत्येक शाळेला थर्मल स्कॅनिंग, ऑक्सिमीटर, तसेच निर्जंतुकीकरण इ.सामुग्री पुरवली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अधिकची साधनेही दिली आहेत.
आश्रमशाळांसमोर अडचणी पालघर जिल्हा हा ग्रामीण तसेच आदिवासीबहुल असल्याने जिल्ह्यात सोयी-सुविधांचीही वानवा आहे. त्यामुळे घर ते शाळा हे अंतर विद्यार्थ्यांना पायी कापावे लागते. त्यातच कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे वसतिगृहे बंद असल्याने विद्यार्थ्यांना काही प्रमाणात त्रास होतो. दुपारच्या माध्यान्न भोजनाची व्यवस्था सुरू झालेली नाही, यामुळेही गरीब विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
वसतिगृहांसमोरील समस्या पालघर जिल्ह्यामधील वसतिगृहे अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच शाळेत जावे लागत आहे. मात्र आता ९वी ते १२ वी वर्ग सुुरू झाल्यानंतर वसतिगृह प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाल्याने लवकरच विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र सध्या तरी ही व्यवस्था होईपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
या विभागाच्या डहाणू कार्यालयांतर्गत डहाणू, तलासरी, पालघर, वसई तालुक्यातील ९वी ते १२वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. तेथे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते. वसतिगृह अद्याप सुरू झालेली नाहीत.- आशिमा मित्तल, डहाणू प्रकल्प अधिकारी