पालघर - जिल्ह्यातील सफाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसंत सानप (38 वर्षे) यांचा ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनमार्फत मैत्रीपूर्ण क्रिकेट सामने भरविण्यात आले होते. या क्रिकेट सामन्यात खेळताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यामध्ये त्यांचे निधन झाले. या घटनेनं जिल्ह्यातील पोलिस वर्तुळात शोककळा पसरली आहे.
मूळचे नाशिक येथील रहिवाशी असलेले संदीप सानपे हे गेल्या वर्षभरापासून सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त होते. रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत सफाळे येथील मकुणसार भागात आज क्रिकेटचे सामने घेण्यात आले. त्यावेळी मैदानात खेळत असताना सपोनि सानप यांना मेजर अटॅक आला. त्यानंतर, त्यांना तात्काळ वसई येथील प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी दवाखान्यात संदीप सानप यांना मृत घोषित केले. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर त्याचे मूळ गावी नाशिक येथे अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती आहे.