पालघर : पालघरमधील अस्वाली धरणात अविवेकी पर्यटकांनी धुडघूस घातला आहे. त्यांच्यावर तत्काळ कारवाई न झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शासनाच्या ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाअंतर्गत पश्चिम घाटाच्या सानिध्यात असलेले हे धरण बोर्डी या पर्यटन स्थळानजीकच्या अस्वाली गावात आहे. हा भाग सीमेवर असल्याने लगतच्या गुजरात राज्यातील तरुणाई येथे मोठ्या प्रमाणात येते. मद्यपान करून अनेक जण पाण्यात पोहण्यासाठी उतरतात. तसेच परिसरात मद्याच्या बाटल्या आणि सोबत आणलेल्या खाद्यपदार्थांचा कचराही फेकला जातो. त्यामुळे पश्चिम घाटाचा हा निसर्गरम्य परिसर अस्वच्छ होत चालला आहे. त्याचा त्रास स्थानिक आदिवासी आणि अन्य पर्यटकांना होतो.
जिल्ह्यातील पंधरा धबधब्यांवर पर्यटकांना जाण्यासाठी तीन महिन्याकरीता मनाई आदेश लागू आहे. तसेच काही ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात आहेत. त्यामुळे त्यामध्ये अस्वाली धरणाचाही समावेश करावा अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे.