वाडा - जगात भारताची कमजोर व गरिबांचा देश म्हणून ओळख होती. भारताला कुणीही झुकवू शकतो, अशी देशाची प्रतिमा निर्माण होऊ पाहत होती. वाजपेयींच्या रूपाने देशाला कणखर पंतप्रधान लाभला. त्यांनी अणुचाचणी घडवून भारत जगातील महासत्ता बनण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले, तसेच कारगिल विजय प्राप्त करून भारत कणखर व बलवान असल्याचे जगाला दाखवून दिल्याचे प्रतिपादन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाडा येथे केले.जनप्रिय स्मृती सेवा संस्था व शिक्षक संचलित शिक्षण संस्था वाडा यांनी संयुक्तपणे उभारलेल्या भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी वाडा येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.पोखरण अणुचाचणी होऊ नये, यासाठी अमेरिका, फ्रान्स, जर्मनी यांसारख्या बलाढ्य देशांनी भारतावर दबाब आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दबावाला न जुमानता अटलजींनी यशस्वी अणुचाचणी करून, भारताची अणुसज्जता सिद्ध केली, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.पालघर जिल्हा कुपोषणाच्या समस्येने नेहमीच चर्चेत राहिला आहे. राज्य शासनाकडून या समस्येबाबत प्रामाणिक प्रयत्न केले जात आहेत. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा व श्रमजीवीचे नेते विवेक पंडित यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. आदिवासी विकास योजना आढावा समितीच्या अध्यक्षपदी विवेक पंडित यांची शासनाने नुकतीच नियुक्ती केली असून, त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जाही दिला आहे. त्याचा फायदा कुपोषण निर्मूलनासाठी होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांच्या हस्ते ग्रामीण भागात विशेष काम करणाऱ्या मान्यवरांना ‘अटल गौरव’ पुरस्कार देण्यात आला.भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीमुख्यमंत्र्यांच्या या दौºयामध्ये तालुका पातळीपासून जिल्हा पातळीवरील सर्व कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी नंतर उघड झाली. तसेच काही उपस्थित कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याची इच्छा प्रकट केली असता, संयोजकांनी व्यासपीठावर येण्यास मज्जाव केला. यामध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी, भाजपाचे विभागीय चिटणीस कुंदन पाटील, तालुका कार्याध्यक्ष मंगेश पाटील, उपसभापती मेघना पाटील, तालुका अध्यक्ष संदीप पवार या प्रमुख पदाधिकाºयांचा समावेश आहे.
भारताला कणखर व बलवान बनविण्यात अटलजींचा सिंहाचा वाटा - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 6:01 AM