विरार : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नालासोपाऱ्यातील अथर्व रूग्णालय शुक्रवारी सील केले आहे. काही महिन्यापूर्वी पालिकेच्या आरोग्य विभागाने पाच भोगस डॉक्टरांवर कारवाई केली होती मात्र आता रुग्णालय सील केल्याने अनिधकृत रित्या व्यवसाय करणाºया डॉक्टरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
गेल्या महिन्यात नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन, बिलाल पाडा, श्रीराम नगर या परिसरातील बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाने कारवाई करून तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हेही नोंदविले होते. शुक्र वारी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश चौहान यांना नालासोपाºयाच्या अथर्व रुग्णालयात बेकायदेशीररित्या गर्भपात केले जात असल्याची माहिती मिळाली. डॉ. चौहान यांनी ती महापालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे यांना दिली व त्यानुसार अथर्व रुग्णालयावर छापा टाकून सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यांच्या तपासणीअंती तेथे त्यांना अवैधरीत्या रूग्णाला दाखल करून घेणे, गर्भपात करणे ही कामे होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे महापालिकेने हे रुग्णालय सील करून तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. यातील आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.