भार्इंदर : शहरापासून सुमारे २ ते १२ किमी अंतरावर वसलेल्या गावांतील प्रवाशांना स्थानिक परिवहन सेवा सोयीस्कर ठरत असताना अस्तित्वातील परिवहन सेवेच्या केवळ १० ते १२ बसच रस्त्यांवर धावत आहेत. त्यामुळे येथील प्रवाशांना जादा पैसे मोजून खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने असमाधानकारक ठरलेल्या परिवहन सेवेविरोधात सर्व उत्तनकर ग्रामस्थ जनमोर्चाच्या माध्यमातून शनिवारी (१७ आॅक्टोबर) परिसरात काळे झेंडे लावून बंद पाळणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. पालिकेची स्थानिक परिवहन सेवा डबघाईला आल्याने त्याचा सर्वात जास्त परिणाम मोर्वा ते उत्तन, पाली, मनोरी व गोराई गावांतील प्रवाशांवर होत आहे. येथील बहुतांशी लोक शहराबाहेर कामधंद्यासाठी जात असल्याने त्यांना भार्इंदर रेल्वे स्थानक तसेच मुंबईला जाण्याकरिता गोराई खाडी गाठावी लागते. त्यासाठी एकमेव वाहतूक मार्ग उपलब्ध आहे. मुंबई पालिकेच्या हद्दीत असलेली गोराई व मनोरी ही गावे मीरा-भार्इंदर शहरांशी भूमार्गाने जोडली गेल्याने त्यांच्यासह मोर्वा, मुर्धा, राई, उत्तन, पाली ही गावेदेखील समुद्रकिनारपट्टीवर वसल्याने त्यांना रस्ते वाहतुकीशिवाय अन्य वाहतुकीचा पर्याय नाही. यासाठी मीरा-भार्इंदर पालिकेने २००५ मध्ये कंत्राटी, तद्नंतर २०१० मध्ये खाजगी-लोकसहभाग (पीपीपी) तत्त्वावरील परिवहन सेवा सुरू केली आहे. ती भंगारावस्थेत गेल्याने या सेवेच्या दिवसाला सरासरी २ ते ४ फेऱ्याच होत आहेत. शिवाय ही सेवा पर्यायी व्यवस्था न करताच मोडीत काढण्यात येणार असल्याने उत्तनकर चिंतित आहेत. वारंवार प्रशासनाला निवेदन व पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याविरोधात उत्तनकरांनी शनिवारी बंद पाळण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
परिवहन सेवेविरोधात उत्तनकर बंद पाळणार
By admin | Published: October 17, 2015 1:35 AM