भिवंडी : राज्य सरकारने ५ ते १२ नोव्हेंबर पक्षी सप्ताह जाहीर केल्याने भिवंडी तालुक्यातील तब्बल दोन हजार हेक्टर जंगलातील पक्षी वाचविण्यासाठी वनअधिकारी साहेबराव खरे हे प्रयत्न करीत आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावोगावी जाऊन नागरिक, मुलांना एकत्र करून जंगल आणि पक्षी वाचविण्याबाबत जागृती करीत आहेत. या मोहिमेला नागरिकही चांगला प्रतिसाद देत आहेत.
तालुक्यातील दाभाड, आदिवासी पाडा, पहारे, आवळे, विश्वगड, कुशिवली, गोंडपाडा, राऊत पाडा, खंबाला, जावईपाडासह बहुसंख्य गाव आणि पाड्यात खरे हे जाऊन जंगलाचे रक्षण कसे करायचे? वणवा कसा टाळायचा? पशूपक्षांचे रक्षण कसे करायचे? याची सविस्तर माहिती देत आहेत. तसेच झाडे, पक्षी, घरटी यांची माहिती देऊन वन्यजीव कायदा आणि पक्षी संवर्धन याविषयी जनजागृती करीत आहेत. त्यांनी आवळे, विश्वगड आणि पहारे परिसरातील ओसाड झालेल्या डोंगरावर ११ हजार झाडे लावली असून, आज हे डोंगर हिरवाईने नटले आहेत.
वृक्ष आणि पर्यावरणप्रेमी दाभाड येथील अमोल भोईर यांनी वनविभागाकडे जखमी अवस्थेत सापडणाऱ्या पशू-पक्षांच्या निवाऱ्यासाठी एक लोखंडी पिंजरा वनपाल किरवली यांच्याकडे सुपूर्द केला. तर शांताराम पाटील, सरपंच अनंता पाटील, प्रमोद सुतार, दीपक भोईर, प्रल्हाद पाटील, अंकुश पाटील, विजय पाटील, पोलीस पाटील गणेश पाटील, कुणाल पाटील हे या मोहिमेसाठी विशेष सहकार्य करीत आहेत. वन परिक्षेत्र अधिकारी संजय धारावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक प्रमोद सुतार, विष्णू आसवले, विकास उमतोल यांचेही सहकार्य मिळत आहे.