लोकमत न्यूज नेटवर्क वाडा : तालुक्यातील चंद्रपाडा येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तिच्यावर योग्य ते उपचार न झाल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, रविवारी पंचायत समितीच्या सभापती अश्विनी लहांगे, जि.प. सदस्य राजेश मुकणे या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याला धारेवर धरले.
चंद्रपाडा येथील भक्ती पाटील (२३) या गर्भवतीच्या पोटात शुक्रवारी दुपारी दुखायला लागले. तिला दवाखान्यात दाखल केल्यानंतर उपचार करून घरी पाठविले. मात्र, रात्री तिला पुन्हा त्रास झाल्याने दवाखान्यात आणले. मात्र, बाळाचे ठोके कमी झाल्याने तिच्यावर उपचार करणाऱ्या डाॅ. तल्ला अन्सारी यांनी उपचारासाठी दुसरीकडे नेण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी तिच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया केली. त्यावेळी बाळ दगावले होते.
आंदोलनाचा इशाराकुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेत व योग्य उपचार न झाल्याने बाळ दगावल्याचा आरोप महिलेचा पती सागर पाटील यांनी केला आहे. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, रविवारी सकाळी लोकप्रतिनिधींनी कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. तल्ला अन्सारी यांची भेट घेऊन घटनेचा जाब विचारला. या पदाधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजय बुरपुल्ले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करीत डाॅ. अन्सारी यांच्या बदलीची मागणी केली. बदली न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.