वाडा : अंगणवाडी कर्मचा-यांच्या मागण्या रास्त असून त्या सोडविण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असून त्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहिल, असे प्रतिपादन शिवसेना पालघर जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती ठाकरे यांनी मोर्चासमोर बोलताना केले.आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज अंगणवाडी कर्मचा-यांनी वाडा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.मोर्चाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वनिता देशमुख, तनुजा भोईर यांनी केले. सर्वप्रथम खंडेश्वरीनाका येथून मोर्चास सुरवात करून तो संपूर्ण वाडा शहरात फिरवून त्याचे तहसील कार्यालयाजवळ सभेत रूपांतर करण्यात आले. यावेळी अंगणवाडी कर्मचा-यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.अंगणवाडी कर्मचा-यांना किमान दहा हजार रुपये व सेवा ज्येष्ठतेनुसार मानधन देण्यात यावे, लाभार्थीच्या आहाराच्या रकमेमध्ये तिपटीने वाढ करावी, टी.एच.आर पध्दत बंद करून लाभार्थीना पर्यायी आहार देण्यात यावा, जून ते आॅगस्ट महिन्याच्या मानधनाची रक्कम तत्काळ देण्यात यावी, फेब्रुवारी २०१७ पासून थकीत असलेली लाभार्थी आहाराची रक्कम द्यावी, अमृत आहार योजनेचे खर्च झालेले पैसे द्यावेत या मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले. मोर्चात वाडा तालुका प्रमुख प्रकाश पाटील, संघटक संगीता ठाकरे यांच्यासह शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडी कर्मचा-यांच्या पाठीशी सेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 1:10 AM