नालासोपारा : मनपा हद्दीतील उद्यानांची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने त्यांची अवस्था बकाल झाली आहे. उद्यानातील साहित्याला गंज लागला असून ती मोडकळीस आली आहेत. उद्यानात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असून अनेक साहित्याची चोरी झालेली आहे. यामुळे उद्यानात येणारे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची गैरसोय होत आहे. एकीकडे सेल्फी पॉइंट, चौकांच्या सुशोभीकरणावर मनपा लाखोंची उधळण करत असताना होत असलेल्या कानाडोळ्यामुळे वसईतील अनेक गार्डनची दुर्दशा झाली आहे.
वसई-विरार शहरात महापालिकेची एकूण १३५ उद्याने आहेत. पालिकेने लाखो रुपये खर्च करून उद्यानांचे सुशोभीकरण केले होते. त्यात लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य, व्यायामाचे साहित्य, बसण्यासाठी बाके ठेवण्यात आली होती. उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका महिला बचतगटांना देण्यात आला होता, मात्र या उद्यानांची देखभाल दुरुस्ती न झाल्याने शहरातील बहुतांश उद्यानांची बकाल अवस्था झाली आहे. गार्डनमधील मुलांची खेळणी, व्यायामाचे साहित्य तुटलेले, काही ठिकाणी पाण्याअभावी झाडे सुकली आहेत.
सेंट्रल पार्क, सनशाइन गार्डन, आचोळे तलाव, मोरेगाव तलाव, फनफिस्टा गार्डन, महेश पार्क, मनवेलपाडा, पापडी, तामतलाव, भास्कर आळी, गोखिवरे, वालीव, धानिबवाग, बोळिंज, छेडानगर या उद्यानांची अवस्था अधिक खराब झाली आहे. लहान मुलांच्या खेळण्याचे, व्यायामाचे साहित्य तसेच ज्येष्ठ नागरिकांची बसण्याची बाके मोडकळीस आली आहेत. त्यांना ठिकठिकाणी गंज लागला आहे. कुठल्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी गवत, झुडपे वाढलेली आहेत. बहुतेक उद्यानांतील दिवे बंद, सुरक्षा यंत्रणा नसल्याने साहित्य चोरीस गेले आहे.
शौचालयाअभावी कुचंबणाकाही उद्यानांत शौचालय आहे, पण अस्वच्छतेने साम्राज्य आहे. पुरुष कसे तरी झाडाझुडपांमध्ये लघुशंका आटोपून घेतात, पण महिलांना कुचंबणा सहन करावी लागते. काही ठिकाणी शौचालय आहे, पण त्याला टाळे आहे.
मुलांनी खेळावे कुठे?मुलांना विरंगुळा मिळावा म्हणून अनेक पालक सायंकाळच्या सुमारास येथे मुलांना आणतात. मात्र, येथील खेळण्यांचे सर्वच्या सर्व साहित्य तुटलेले आहे. झुले तुटून पडले आहेत, तर घसरपट्टी मोडकळीस आली आहे. अशा खेळण्यांवर कधीही मुलांचा अपघात होण्याची भीती पालकांना असते.