कासा : डहाणू तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत पूर्वेकडे जय अंबे ढाब्याशेजारी गेल्या आठवडाभरापूर्वी बेकायदा गौण खनिज उत्खनन केले होते. या जमिनीच्या बाजूला आदिवासी लोकवस्ती असून, त्यांच्या घराच्या बाजूला दोन जेसीबींच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले असून, पावसाळ्यात माती खचून घरांचे नुकसान होण्याची भीती आहे. येथील नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला होता. चौकशीनंतर अखेर महसूल विभागाने एक कोटीचा दंड ठोठावला आहे.
या खोदकामाबाबत ग्रामपंचायत व महसूल विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसून आतापर्यंत शेकडो ट्रक माती, मुरूम खोदून लाखो रुपयांचा महसूल बुडाला होता. ही जमीन आदिवासींची असून, या जमिनीचा वाद हा न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना, येथे अनधिकृतपणे उत्खनन केले. याबाबत ग्रामपंचायत आंबोलीचे सरपंच चैत्या रायत यांनी तलाठी सजा धुंदलवाडी, डहाणू तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यात चौकशीनंतर महसूल विभागाने तत्काळ यावर कारवाईची नोटीस बजावली आहे. दरम्यान, आंबोली येथील गट क्रमांक २५ मधील क्षेत्र १.६०० या जमिनीवर कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत माती भराव केले. यामुळे मंडळ अधिकारी समीर राणा सायवन यांनी चौकशी करून अहवाल दिला की, सात दिवसांच्या आत खुलासा करून दंडीत रक्कम भरावी. यामध्ये लेखी किंवा तोंडी म्हणणे ऐकले जाणार नाही. २०२६ ब्रास मातीसाठी एकूण १ कोटी १० लाख ३५ हजार ९२६ रुपये दंड आकारणी केला असून, तसा आदेश तहसीलदार डहाणू यांनी काढला आहे.
आंबोली येथील गौण खनिज उत्खननाबाबत तक्रार दाखल झाली आहे व याबाबत दंडाचा आदेश काढला आहे.- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू.