बदलापूर : पर्यायी उड्डाणपुलाअभावी बदलापूरमध्ये दिवसेंदिवस वाहतूककोंडीची समस्या वाढत चालली आहे. बदलापूर पूर्व- पश्चिम भागाला जोडणाऱ्या बेलवली ते कात्रप या उड्डाणपुलाला एमएमआरडीएकडून मंजुरी मिळाली असल्याचे तसेच बॅरेज रोड-होप इंडिया उड्डाणपुलालाही हिरवा कंदील मिळाला असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, अद्यापही या उड्डाणपुलांच्या उभारणीच्या हालचाली दिसत नसल्याने बदलापूरकरांना नव्या उड्डाणपुलांच्या प्रतीक्षेत वाहनकोंडीचा सामना करावा लागत आहे.
सध्या बदलापूरमध्ये पूर्व-पश्चिम भागात ये- जा करण्यासाठी वाहनांना नगरपालिका कार्यालयाजवळून जाणारा उड्डाणपूल हा एकमेव सोयीस्कर मार्ग आहे. पूर्वी शहराच्या पूर्व-पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी वाहनचालकांना बदलापूर रेल्वेस्टेशन फाटक, बेलवली रेल्वे फाटक व सध्याच्या उड्डाणपुलाजवळ असलेला सबवे असे तीन पर्याय होते. उड्डाणपुलाची उभारणी झाल्यानंतर दोन्ही रेल्वे फाटके बंद करण्यात आली. सबवेही अरुंद झाल्याने फक्त दुचाकी जाऊ शकतील एवढाच रस्ता तिथे आहे. त्याचबरोबर बेलवलीतील सब-वे मध्ये बारमाही पाणी साचत असल्याने तो फारसा उपयोगाचा नाही. त्यामुळे बदलापूर पूर्व- पश्चिम भागात ये-जा करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीची संपूर्ण भिस्त या एकमेव उड्डाणपुलावर आहे. या उड्डाणपुलावर एखादे वाहन बंद पडल्यास काही मिनिटांंत मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यामुळे बेलवली ते कात्रप तसेच बॅरेज रोड-होप इंडिया या भागात पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाची उभारणी होण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.
नेत्यांनी सांगितलेले खरे की खोटे?nगेल्यावर्षीच्या मे महिन्यात एमएमआरडीए बेलवली-कात्रप या उड्डाणपुलाचे काम करणार असल्याबाबत निर्णय झाला असून लवकरच पुढील कार्यवाही करून या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. हा पूल चारपदरी असेल, असेही सांगण्यात आले होते. त्यानंतर, बॅरेज रोड-होप इंडिया या रेल्वे उड्डाणपुलाचीही उभारणी करण्यासाठी एमएमआरडीएने हालचाली सुरू केल्या असल्याचे राजकीय पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या उड्डाणपुलांच्या उभारणीसंदर्भात कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने नव्या उड्डाणपुलांची उभारणी होणार तरी केव्हा, असा सवाल बदलापुरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.